![]()
डफरीन रुग्णालयातील व्हेंटीलेटर स्फोटात तीन नवजात बालकांच्या मृत्यूनंतर शिवसेना (उबाठा) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. व्हेंटीलेटरच सरकारला व्हेंटीलेटरवर आणत असल्याचा टोला त्यांनी लगावला. घटनेच्या सातव्या दिवशी त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली. सावंत यांनी या घटनेला ‘अत्यंत क्लेषदायी’ म्हटले. राज्यात यापूर्वीही असे अपघात घडले असतानाही शासन आरोग्य सेवेबाबत गंभीर नसल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाल्याचे ते म्हणाले. पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख असलेल्या सावंत यांनी रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. इमारत, मांडणी, फर्निचर आणि विविध विभाग चांगले असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, रुग्णालयाचा आत्मा असलेली आरोग्य सेवाच योग्य नसेल, तर या सर्व बाबींचा काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुरेसे डॉक्टर आणि पूरक कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्या दिमतीला असलेली यंत्रसामुग्रीही योग्य क्षमतेची असावी लागते. व्हेंटिलेटरला स्टॅबिलायझर नसल्याने स्फोट झाला असेल, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. शासनाच्या खरेदी पद्धतीवर प्रहार करत, ‘एल वन’ (सर्वात कमी रकमेची निविदा) धोरण किमान रुग्णालयांसारख्या ठिकाणी वापरू नये, असे सावंत म्हणाले. रुग्णालयातील सेवा दर्जेदार ठेवायची असेल, तर येथील यंत्रसामुग्रीही तेवढीच दमदार असणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी, सावंत यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांच्याकडून २४ ऑगस्ट रोजीच्या अग्निकांडाचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी आमदार गजानन लवटे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे आणि शहरप्रमुख प्रवीण हरमकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
अरविंद सावंत यांचा सरकारवर उपरोधिक टोला:डफरीन अग्निकांड: आरोग्य सेवेतील त्रुटींवरून साधला निशाणा