![]()
गेली ४१ वर्षांपूर्वी तयार झालेल्या यशवंतनगर तर ३३ वर्षांपूर्वी तयार झालेल्या संग्रामनगर ग्रामपंचायतींना अकलूज पाणीपुरवठा योजनेतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी २०२२ मध्ये ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू झा
.
अकलूज शहराचा भाग असलेली यशवंतनगर ग्रामपंचायत १९८५ मध्ये तर संग्रामनगर ग्रामपंचायत १९९३ मध्ये अस्तित्वात आली. अकलूजसाठी विझोरी येथे जुनी पाणीपुरवठा योजना असून, ही दोन्ही स्वतंत्र गावे म्हणून उदयास आली. यातूनच अद्याप या दोन्ही गावांनाही पाणीपुरवठा सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार अकलूजची लोकसंख्या ३९,९१६ तर यशवंतनगर १४१९३ व संग्रामनगर ६४९९ अशी आहे. त्यात आता अकलूज नगर परिषदेत माळेवाडी समाविष्ट केली आहे. माळेवाडीची लोकसंख्या ६७०० मिळून सुमारे सुमारे ६७ हजार लोकवस्तीला या योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. शिवाय गेली १५ वर्षांत वाढलेली लोकसंख्या वेगळी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करताना नगर परिषदेची त्रेधा उडत आहे.
अकलूज नगर परिषदेच्या निर्मितीनंतर वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात विझोरी साठवण तलावाचे विस्तारीकरण, ७७ मैलातून थेट पाणी आणणे आदी विकासकामे मंजूर असली तरी उपलब्ध पाण्यात सर्वांना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने संग्रामनगर व यशवंतनगरसाठी २०२२ मध्ये स्वतंत्र जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन कामे सुरू झाली. खुडूस हद्दीतील नीरा उजवा कालव्याजवळ जलशुद्धीकरण केंद्र, पंपघर तसेच पाणी साठवण तलावाची कामे गुजरातमधील कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यांना कार्यालयीन दिरंगाईसाठी वाढवून दिलेल्या वेळेसह ही कामे दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची आहेत. वास्तविक ही कामे सुरू होऊन जवळपास अडीच वर्षे पूर्ण झाली असून, यशवंतनगर योजनेचे ५४.५७ टक्के तर संग्रामनगर योजनेचे ६४.४९ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत ४० टक्के काम चार महिन्यांत पूर्ण करायचे आहे. ^यशवंतनगर व संग्रामनगर पाणीपुरवठा योजनेची कामे गुजराथच्या एन. आर. ई. पी. एल. कंपनीला सन २०२२ मध्ये दिली आहेत, काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षे आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळण्यास ६ महिन्यांचा वेळ गेला होता. तो त्यांना वाढवून दिला असून त्यानुसार दि ३१ डिसेंबर २०२६ रोजी ही मुदत संपत आहे. सध्या यशवंतनगर पाणीपुरवठा ५४.५७ तर संग्रामनगर ६४.४९ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम मुदतीत पूर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपनीला सूचना दिल्या आहेत. – अशिफ शेख, अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अकलूज
कामाची किंमत : ३३५१.३२ लाख रुपये मंजुरी/आदेश : १० नोव्हेंबर २०२२ कामाचा कालावधी : ३० महिने वाढीव मुदतीसह मुदत : ३१ डिसेंबर २०२६ कामाची प्रगती : ६४.४९ टक्के रक्कम अदा : ५०.७८ टक्के