![]()
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात आज भक्तीचा एक अद्भुत आणि चैतन्यमय सोहळा पाहायला मिळाला. शिवसेना नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली भव्य ‘हर हर महादेव’ कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. क्रांतीचौक येथून सुरू होऊन खडकेश्वरपर्यंत मार्गक्रमण करणाऱ्या या विश्वविक्रम मानांकन प्राप्त यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. जयघोषाने परिसर दुमदुमला सकाळी 10 वाजता आमदार अंबादास दानवे स्वतः खांद्यावर पवित्र कावड घेऊन क्रांतीचौकात दाखल झाले. यावेळी ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘बम बम भोले’च्या अखंड जयघोषाने अवघा परिसर शिवमय झाला होता. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले हजारो शिवभक्त पवित्र जलकलश घेऊन या यात्रेत सामील झाले होते. डीजेच्या तालावर आणि डमरूच्या निनादावर शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला. उज्जैनचे डमरू पथक आणि बाल वारकरी या भव्य कावड यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते थेट उज्जैन येथून खास आमंत्रित करण्यात आलेले डमरूचे ‘भस्म रमैय्या भक्त मंडळ’. त्यांच्या डमरूच्या नादाने यात्रेतील भक्तीभाव अधिकच वाढवला. यासोबतच हभप नवनाथ महाराज आंधळे यांच्या वारकरी शाळेतील चिमुकल्या बाल वारकऱ्यांनी आणि महिला भजनी मंडळांनी यात्रेत सहभाग घेत वेगळीच रंगत आणली. स्वच्छतेचा संदेश आणि दिग्गजांची उपस्थिती या मंगलमय सोहळ्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि उपनेते सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, या यात्रेत केवळ धार्मिक उत्साह नव्हता, तर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या पथकाने सहभाग नोंदवत नागरिकांना स्वच्छतेचा सामाजिक संदेशही दिला. या भव्य कावड यात्रेची काही खास फोटोज पाहा..
Source link
श्रावणी सोमवारचा उत्साह:संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात भव्य 'हर हर महादेव' कावड यात्रा; पाहा व्हिडिओ आणि फोटोज