Headlines

पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून फिरस्त्याने सात पिस्तूले चोरली:एका पिस्तुलाने पोलिस ठाण्यासमोरच एकाला केले ‘हॅण्ड्‌सअप’; आरोपीला अटक




पुण्यात बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एका कचरा वेचणाऱ्या फिरस्त्याने सात पिस्तूले चोरली. त्यातील एका पिस्तुलाने त्याने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला ‘हॅण्ड्‌सअप’ केले. त्यावेळी पिस्तूल चोरीचा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी, बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार संजयकुमार चिटेकर (मूळचा कलबर्गी, कर्नाटक) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेंट्रल बिल्डिंगसमोरील मुद्देमाल कक्षात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलिसांचा सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीच्या एका खोलीत मुद्देमाल कक्ष आहे. आरोपी राकेशकुमार हा मूळचा कर्नाटक येथील कलबर्गीचा रहिवासी असून, पुण्यात तो फिरस्ता आहे आणि त्याला दारूचे व्यसन आहे. शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तो कचरा गोळा करत मुद्देमाल कक्षाच्या खोलीपर्यंत पोहोचला. त्यानंतर पाठीमागील दरवाजा उचकटून तो आत गेला. तिथे त्याने सुरुवातीला काही बिअरच्या बाटल्या चोरल्या आणि बिअर प्यायला. त्यानंतर तेथील सात पिस्तूले त्याने चोरली. दिवसभर ही पिस्तूले तो सोबत घेऊन फिरत होता. राकेशकुमार फिरत-फिरत साधू वासवानी चौकातून बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या समोर आला. त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. त्याने एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवून ‘हॅण्ड्‌सअप’ म्हटले. त्या व्यक्तीने ही माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली. पोलिस त्याला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. चौकशीत त्याने ते पिस्तूल सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीतून चोरल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिस ठाण्यातील एका चाणाक्ष पोलिसाची नजर त्या पिस्तुलावर गेली. त्यावर ‘बीएल’ असे लिहिलेले होते, म्हणजेच ते पिस्तूल कोणत्यातरी गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेले होते. बंडगार्डन पोलिस खडबडून जागे झाले. त्यांनी राकेशकुमारकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने आणखी काही पिस्तूले आपल्याकडे होती असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याची पिशवी त्याच ठिकाणी पडली होती. त्या पिशवीत सहा पिस्तूले होती. पोलिस जेव्हा ती पिशवी शोधायला गेले, त्यावेळी ती मिळाली नाही. ती पिशवी दुसऱ्या एका फिरस्त्याने उचलून नेली होती. सहा पिस्तुलांचा शोध रात्रभर बंडगार्डन पोलिस घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता, एक व्यक्ती ती पिशवी उचलून घेऊन जाताना दिसला. त्याचा माग काढत पोलिसांनी जनरल पोस्ट ऑफिसचा परिसर गाठला. एका झाडात ती पिशवी पोलिसांना मिळाली. पिशवी उघडून पाहताच सहा पिस्तूले त्यामध्ये मिळाली. पिस्तूले मिळताच बंडगार्डन पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी, बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *