Headlines

ज्येष्ठ संगीत शिक्षक शशिकांत भंडारे यांचे 86 व्या वर्षी निधन:त्यांनी 60 वर्षे “नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या” माध्यमातून संगीताचे अध्यापन केले




पुण्यातील ज्येष्ठ संगीत शिक्षक, साहित्यिक आणि कीर्तनकार शशिकांत भंडारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात संगीत, साहित्य आणि कीर्तन क्षेत्रात मोठे योगदान दिले. शशिकांत भंडारे यांनी पुण्यात ६० वर्षे राजेंद्र नगर आणि पर्वती परिसरात “नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या” माध्यमातून संगीताचे अध्यापन केले. ते एक उत्तम व्हायोलिनवादक आणि हार्मोनियमवादक होते. त्यांना दक्षिणात्य व्हायोलिन वादक एस. नाथन आणि सुप्रसिद्ध गायक विनायक बुवा पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांनी अनेक नामवंत संगीत आणि नाट्य कलाकारांना घडवले. त्यांनी “ज्ञानियांचा राजा”, “देवा तूची गणेशु” आणि “श्रीलक्ष्मीनारायण अवतार” यांसारख्या अनेक संगीतमय समूहनाट्यांची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन केले. या नाट्यांमध्ये त्यांनी शंभरहून अधिक कलाकारांना घेऊन सादरीकरण केले. भंडारे एक उत्तम साहित्यिकही होते. त्यांचे कथासंग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, अध्यात्म आणि ज्योतिषविषयक अशी एकूण १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापैकी चार पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी सुमारे चार दशके अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन केले. त्यांनी महाराष्ट्रात एक हजाराहून अधिक नारदीय कीर्तने केली. या कीर्तनांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या “जीवन साफल्य पुरस्कारा”सह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ते आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्तनिवेदिका, मुक्त पत्रकार आणि कीर्तनकार दीपा भंडारे यांचे वडील होते. तसेच, नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या संचालिका भाग्यश्री भंडारे या त्यांच्या कन्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *