Headlines

डॉ. स्मीता सोनटक्के ‘जीएमसी’च्या प्रभारी डीन:कायमस्वरुपी डीनच्या नियुक्तीचा आदेश अद्याप आलेला नाही




अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) प्रभारी डीनपदाची जबाबदारी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. स्मीता सोनटक्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्या फॉर्म्याकोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. डॉ. नंदकिशोर राऊत हे सोमवारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले, त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. शासनाने अद्याप नियमित डीनची नियुक्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवीन डीनची नियुक्ती होईपर्यंत डॉ. सोनटक्के यांच्याकडेच पदभार राहील. डॉ. राऊत आणि डॉ. सोनटक्के यांच्यातील पदभाराची अदलाबदल मंगळवारी सकाळी झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत नवीन आदेश येईल असे वाटत असल्याने त्याच दिवशी पदभार सोपवणे शक्य झाले नाही, असे कारण सांगितले जाते. ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात डॉ. सोनटक्के यांच्याकडेच पदभार सोपवला जाईल, असे म्हटले होते. आज सकाळी घडलेल्या घडामोडीनंतर ते खरे ठरले. डॉ. नंदकिशोर राऊत रुजू होण्यापूर्वी डॉ. किशोर इंगोले यांनी डीनचा पदभार सांभाळला होता. सुरुवातीला डॉ. अनिल बत्रा यांनी हे पद सांभाळले होते. डॉ. राऊत यांनी दहा महिने हे पद सांभाळले. आता चौथ्या डीनपदी कोण येते, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. डॉ. राऊत यांच्या कार्यकाळात जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकाच वेळी जीएमसीला जोडण्याचा नवीन करार करण्यात आला. यापूर्वीच्या करारानुसार केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयच जीएमसीला जोडले होते. डॉ. राऊत यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन, सर्व विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वसतिगृहाची सोय केली. तसेच त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्याही योग्य ठेवली. या कामात फिजीओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण जाधव, फॉर्म्याकोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मीता सोनटक्के आणि फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सचिन गाडगे यांनी त्यांना सहकार्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *