![]()
अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करून भ्रष्टाचाराला थारा न देण्याचे आवाहन केले. लाच स्वीकारणे हा दंडनीय अपराध असल्याचे एसीबीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सांगितले. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती कार्यशाळा झाली. सीईओ गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बांगर यांनी लाच स्वीकारल्यास होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. या कारवाईचा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होणारा परिणामही त्यांनी सांगितला. कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले उपस्थित होते. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांचीही उपस्थिती होती. गांधी म्हणाले की, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि जबाबदारीने पार पाडावे. प्रत्येकाने कामात सचोटी राखून भ्रष्टाचाराला थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. बांगर यांनी लाच स्वीकारणे किंवा देणे यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी आणि त्याचे परिणाम समजावून सांगितले. शासकीय काम करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार पोलीस निरीक्षक नीलिमा सातव यांनी मानले. एसीबीचे अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे, पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड आणि रमेश टाले, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे आणि संजय शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Source link
सीईओ सत्यम गांधी यांनी भ्रष्टाचाराला थारा न देण्याचे आवाहन केले:जि.प. अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याची सूचना; एसीबी अधीक्षक बापू बांगर यांनी लाचेच्या कायदेशीर परिणामांची माहिती दिली