![]()
“2019 पर्यंत उद्धवजींनी जेव्हा-जेव्हा फोन केला, तेव्हा मी आलो; पण 2019 नंतर त्यांनी बोलावलं नाही. मी वाटच पाहत राहिलो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिश्कील टोला लगावला. मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची चर्चा रंगली. कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या फोनचा उल्लेख केला. “राज ठाकरे यांनी फोन केला की फडणवीस येतात, असे आशिष शेलार म्हणाले. पण 2019 पर्यंत उद्धवजींनी जेव्हा-जेव्हा फोन केला, तेव्हा मी आलो. त्यानंतर त्यांनी बोलावलं नाही. मी वाटच पाहत राहिलो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानातून उपस्थितांमध्ये हशा पिकला. कार्यक्रमाच्या शेवटी भाषण करण्याचा फायदा सांगतानाही फडणवीस यांनी मिश्कील टिप्पणी केली. “कार्यक्रमामध्ये शेवटचे भाषण देण्याचा फायदा असा की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आज मी काही बोललो तरी त्यावर प्रतिहल्ला होणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमातील वातावरण हलकेफुलके झाले. व्यंगचित्रकारांच्या कलेचे फडणवीसांकडून कौतुक व्यंगचित्रकारांच्या कार्याचा गौरव करणारे आणि त्यांच्या इतिहासाचे संकलन करणारे पुस्तक संपादक प्रशांत कुलकर्णी यांनी सुंदर पद्धतीने तयार केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या पुस्तकात वेगवेगळ्या काळातील व्यंगचित्रकारांची चित्रे, त्यांची ओळख, चरित्र आणि त्यांच्या कामाचा संदर्भ समाविष्ट करण्यात आला आहे. जुन्या काळातील व्यंगचित्रे मिळवणे आणि त्यांचे संदर्भ जतन करणे हे कठीण काम असल्याचेही त्यांनी नमूद केले. “व्यंगचित्र ही अशी कला आहे की, एक शब्दही न बोलता त्यातून आवश्यक तेवढे फटके मारता येतात आणि नेमके काय सांगायचे आहे, तेही प्रभावीपणे मांडता येते,” असे फडणवीस म्हणाले. एखादा अग्रलेख ज्या पद्धतीने तत्कालीन परिस्थितीचे विश्लेषण करतो, त्याचप्रमाणे एक व्यंगचित्रही त्या काळातील घडामोडी आणि परिस्थिती मांडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. व्यंगचित्रकाराला एखाद्या घटनेचे बारकाईने निरीक्षण करून ते चित्राच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करावे लागते. हे काम सोपे नसले, तरी व्यंगचित्रकार ते सातत्याने करत असतात. त्यामुळे व्यंगचित्र पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद मिळतो, असेही फडणवीस यांनी सांगितले. ‘माझं नाक-कान मोठं काढा, पण पोट मोठं काढू नका’ स्वतःवरील व्यंगचित्रांचा उल्लेख करताना फडणवीस यांनी एक किस्साही सांगितला. “मी एकदा राज ठाकरे यांना विनंती केली होती की, माझे व्यंगचित्र काढताना माझे नाक मोठे काढा, कान मोठे काढा; पण पोट मोठे काढू नका,” असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आपली विनंती ऐकल्याचे सांगत त्यांनी मिश्कीलपणे टिप्पणी केली की, इतर व्यंगचित्रकारांना मात्र आपले पोटच दिसते. अलीकडच्या काळात आपण थोडे वजन कमी केले असून, त्यामुळे काही व्यंगचित्रकार आता आपल्याला व्यंगचित्रांतून सोडतील, असा विश्वासही त्यांनी विनोदाने व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. नेपोलियनच्या उदाहरणातून व्यंगचित्राची ताकद सांगितली व्यंगचित्राच्या प्रभावाचे महत्त्व स्पष्ट करताना फडणवीस यांनी नेपोलियनशी संबंधित एका व्यंगचित्राचा संदर्भ दिला. या चित्रात नेपोलियन आणि ब्रिटिश पंतप्रधान पृथ्वीचे केक किंवा पेस्ट्रीप्रमाणे तुकडे करत असल्याचे दाखवण्यात आले होते. हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर नेपोलियनने, युरोपच्या सैन्याला जेवढे नुकसान आणि बदनामी करता आली नाही, तेवढे नुकसान एका व्यंगचित्राने केले, असे म्हटल्याचा संदर्भ त्यांनी दिला. या उदाहरणातून व्यंगचित्राची ताकद अधोरेखित होत असल्याचे फडणवीस म्हणाले. विविध काळांतील महत्त्वाच्या घटना, राजकीय घडामोडी आणि विरोधाची भूमिका व्यंगचित्रांच्या माध्यमातून सातत्याने मांडली गेली आहे. महाराष्ट्रातील मराठी व्यंगचित्रकारांनी ही परंपरा जपल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन उभारणार कार्यक्रमात व्यंगचित्रकारांसाठी मुंबईत स्वतंत्र दालन असावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. “आशिषजी आणि आम्ही यासाठी पुढाकार घेऊ. त्याकरिता राज ठाकरे आणि उद्धवजी या दोघांचीही मदत घेऊ. व्यंगचित्रकारांच्या चित्रांचे उत्तम दालन तयार करू,” असे ते म्हणाले. या दालनाच्या माध्यमातून व्यंगचित्रकारांची कला, त्यांचे योगदान आणि व्यंगचित्रांचा ऐतिहासिक प्रवास जतन करता येईल, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. ‘महाराष्ट्रात राजकीय मतभेद असले तरी संवाद कायम’ फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहण्याबाबत आपल्याला आश्चर्य वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करणारे नेते एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतात, एकत्र बसू शकतात, हसू शकतात आणि चहाही पिऊ शकतात, असे ते म्हणाले. “आम्हाला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले किंवा आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित आहोत, याचे आश्चर्य वाटलेले नाही. या कार्यक्रमाला जावे की नाही, असा विचारही मनात आला नाही. कारण महाराष्ट्राची ही परंपरा आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांतील राजकीय नेत्यांमध्ये तीव्र वैर दिसून येते, असे मत व्यक्त करताना त्यांनी महाराष्ट्रात मात्र राजकीय मतभेद असूनही संवादाची परंपरा कायम असल्याचे नमूद केले. या परंपरेमुळेच वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येऊ शकतात, असे ते म्हणाले. 75 व्यंगचित्रकारांच्या कार्याचा दस्तावेज या पुस्तकात सुमारे 75 व्यंगचित्रकारांची चित्रे, चरित्रे आणि ओळख समाविष्ट करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पिढ्यांतील व्यंगचित्रकारांचा प्रवास एकाच ठिकाणी मांडण्याची कल्पना वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ग्रंथालयाने गेल्या 52 वर्षांत विविध पुस्तकांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे काम केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. संपादक प्रशांत कुलकर्णी आणि ग्रंथालयाचे सुदेश हिंगलाजपूरकर यांचे आभार मानताना फडणवीस यांनी या पुस्तकाचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादी कला किंवा कौशल्य असते. ज्यांना ज्या क्षेत्रात गती आहे, त्यांनी त्या क्षेत्रात उत्तम काम करावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. “मला राजकारण समजते, म्हणून मी राजकारणात काम करतो. हे व्यंगचित्रकार चांगले व्यंगचित्रकार आहेत, छायाचित्रकार चांगले छायाचित्रकार आहेत; त्यांनी मला राजकारणात काम करू दिले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विनोद केला. राज ठाकरे यांच्या निमंत्रणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. तसेच प्रशांत कुलकर्णी आणि सुदेश हिंगलाजपूरकर यांनी ऐतिहासिक दस्तावेजाच्या प्रकाशनाची संधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. “धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र,” असे म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला. हेही वाचा….. ‘2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं’:राज ठाकरेंचा फडणवीसांना मिश्कील टोला, एकाच मंचावर ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सत्ताबदल, पक्षफुटी, आमदारांची फोडाफोडी आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याचे राजकारण सातत्याने चर्चेत राहिले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघेही एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या मिश्कील विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘2029 सालापर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं,’ असे म्हणत राज ठाकरेंनी राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य केले. सविस्तर वाचा….
Source link
‘उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो’:2019 नंतर फोनच आला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला