![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, मंगळवारी (१ सप्टेंबर) अतिक्रमण विभागाने हर्सूल परिसरातील ८ एकरांवरील सुमारे ७०० अनधिकृत प्लॉटवर जेसीबी फिरवला. या कारवाईमुळे भूमाफियांना मोठा धक्का बसला आहे. अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, केवळ रिकाम्या प्लॉटवरच नाही, तर अनधिकृतपणे बांधलेल्या पक्क्या घरांनाही आता नोटिसा बजावण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा परिसरात करण्यात आली आहे. अतिक्रमण पथकाने हर्सूलमधील गट क्रमांक २७५ मध्ये पहिली कारवाई केली. दादासाहेब जनार्दन औताडे, महादेव नारायण वाणी आणि रवींद्र सुदाम औताडे यांच्या मालकीच्या ४.५ एकर जागेवरील बोगस ले-आऊटच्या हद्दी आणि खुणा नष्ट करण्यात आल्या. येथे ३५० ते ४०० अनधिकृत प्लॉट पाडण्यात आले. यानंतर पथकाने हर्सूल येथील गट क्रमांक ६१ कडे मोर्चा वळवला. शेख रिजवान शेख रियाज आणि इतरांच्या मालकीच्या अंदाजे ३.५ एकर जागेवरील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई झाली. येथील साधारण २८० ते २९० प्लॉट्सच्या सीमारेषा आणि खुणा जेसीबीने पूर्णपणे उखडून टाकण्यात आल्या. हर्सूल गट क्रमांक २७ मध्ये सुरेंद्र कोलते यांच्या जागेवर मनपाची परवानगी नसताना अंदाजे ६० ते ६५ पक्की घरे बांधल्याचे कारवाईदरम्यान समोर आले. तसेच, ५ रिकाम्या प्लॉट्सवर तार कंपाउंड केले होते. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, या सर्व पक्क्या घरांना आता मनपातर्फे कायदेशीर नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक आयुक्त उदय मानवतकर, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक संतोष वाचासुंदर आणि रवींद्र देसाई यांच्यासह अतिक्रमण पथक उपस्थित होते. ३ जेसीबी आणि ३ हायवा ट्रक्सच्या मदतीने हे अनधिकृत ले-आऊट पाडण्यात आले. अनधिकृत ले-आऊट करणाऱ्यांविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील अनधिकृत आणि अवैध प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२ सप्टेंबर) सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपजिल्हाधिकारी, अपर तहसीलदार आणि सर्व दुय्यम निबंधकांना उपस्थित राहण्याचे पत्र अतिक्रमण विभागाने दिले आहे. कारवाईत सर्व विभागांचा समन्वय साधणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
Source link
हर्सूलमध्ये 8 एकरांवरील 700 अनधिकृत प्लॉटवर मनपाचा जेसीबी:भूमाफियांवर कारवाई, पक्क्या घरांनाही नोटिसा बजावणार; मनपा आयुक्तांनी दिले आदेश