Headlines

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा:प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची मागणी




महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर ‘हक्क मूक मोर्चा’ काढला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हा परिषद मुख्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे मानद अध्यक्ष कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष आशिष भागवत आणि सरचिटणीस प्रशांत टिंगणे यांनी केले. या आंदोलनाचे मुख्य कारण १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील वडगाव येथे घडलेली घटना आहे. ग्रामपंचायत कर्मचारी व्ही. पी. पाटील यांच्यावर कार्यालयात काम करत असताना जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. काही जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत अधिकारी संपावर गेले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या. दिवंगत व्ही. पी. पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करून सर्व संशयितांवर लगेच गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे आणि ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांचे अनधिकृत व्हिडिओ काढण्यावर किंवा ते सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करण्यावर पूर्ण बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली. संवेदनशील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण मिळावे, अशीही मागणी करण्यात आली. कृषी, आरोग्य, समाजकल्याण यांसारख्या इतर विभागांच्या योजनांचा अतिरिक्त भार कर्मचाऱ्यांवर लादणे बंद करावे, असेही त्यांनी सांगितले. सर्व सवलती, पदोन्नती आणि वेतन सुधारणा वेळेवर लागू कराव्यात, तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ कायम सेवेत समाविष्ट करावे, अशा मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या. या आंदोलनासोबतच ग्रामपंचायत अधिकारी युनियनने संप आणि बहिष्काराची घोषणा केली होती. त्यापैकी ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांवरील बहिष्काराचे आंदोलन अमरावतीत अजूनही सुरू आहे. ग्रामसभेचे इतिवृत्त नोंद करणे हे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे काम असते. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही ग्रामसभेला सचिव म्हणून अनुपस्थित राहण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे, असे मानद अध्यक्ष कमलाकर वनवे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *