![]()
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या भेटीसाठी आज शासनाचे शिष्टमंडळ गेले होते. मात्र जरांगे यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावत, अधिकाऱ्यांना का पाठवले, नेत्यांना येता येत नाही का? असा सवाल केला. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यानंतर विखे पाटील, मंत्री उदय सामंत व प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांना त्या मसुद्यात काय कमतरता वाटते, त्यानुसार जो त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया येईल त्यानुसार पुढे कारवाई करता येईल. आता असे आहे की माननीय जिल्हाधिकारी आणि बाकीचे अधिकारी गेले होते, पण त्यांनी मंत्र्यांनी तिथे येणे अपेक्षा केली होती. परंतु, आपण जो मसुदा तयार केला आणि त्यांना पाठवला आहे. आता त्यावर त्यांची भूमिका काय आहे, याची माहिती जर मिळाली तर त्यात बदल करता येतील. अद्याप त्यांनी काही बदल सुचवलेले नाहीत. त्यांची प्रतिक्रिया जेव्हा येईल तेव्हा आपण निर्णय घेऊ. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मसुदा आपण मांडला आहे. जिल्हाधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून गेले आहेत. शासनाच्या वतीने मसुदा त्यांनी मांडला आहे. आम्ही दिलेला जो मसुदा आहे, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. त्यांनी प्रतिक्रिया दिल्याशिवाय आम्ही पुढील निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. आतापर्यंत याच सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मी म्हणत आहे की अजून त्यात काही उणिवा असतील तर त्यात बदल केले जातील. शेवटी लोकांनी अर्ज करणे गरजेचे आहे, असे अनेक बाबी आहेत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या उपोषणाला शासनाने चांगला प्रतिसाद दिला होता. आताही आम्ही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहोत. त्यांना भेटायला काही अडचण नाही. मराठा समाजाच्या प्रश्नाच्या पुढे कोण काय बोलते याला फारसे महत्त्व देत नाही. तसेच लोकशाहीमध्ये आपण कसे बोलतो, काय बोलतो, याचे काही पथ्य पाळले गेले पाहिजेत, असा सल्ला देखील विखे पाटलांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. उदय सामंत काय म्हणाले? उदय सामंत म्हणाले, आम्ही कायम सकारात्मक निर्णय घेत आहोत. मसुदा देखील सकारात्मक आहे. आमची मनोज जरांगे यांना विनंती आहे की त्यांनी देखील सकारात्मक पद्धतीने घ्यावे. सगळा मसुदा तयार झाला की त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली की त्यात बदल करून पुन्हा मसुदा तयार करता येईल. तसेच त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, आम्हाला सगळ्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. आज जरी अधिकारी गेले असतील तरी नंतर अंतिम निर्णय घेताना आम्ही सगळे सोबत असणारच आहोत. पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा थांबलेले काम त्यांनी पुढे नेले आणि 10 टक्के आरक्षण लागू केले होते. आता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. आम्ही मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करत आहोत. आणि आम्ही सकारात्मक आहोत म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. मनोज जरांगे यांच्यासारखा एखादा कार्यकर्ता समाजासाठी काम करत असेल तर त्यांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. जरांगेंनी सकाळपर्यंत उत्तर द्यावे- प्रसाद लाड प्रसाद लाड म्हणाले, तज्ञ लोकांनी अभ्यास केला होता आणि त्यानंतर आम्ही त्यांना मसुदा पाठवला आहे. मागच्या वेळेस देखील असेच केले होते, आमची भूमिका स्पष्ट आहे, सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि सकाळपर्यंत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. ‘अधिकाऱ्यांना का पाठवलं, नेत्यांना येता येत नाही का?’:मनोज जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाचा प्रस्ताव नाकारला; सकाळपर्यंतचा दिला अल्टिमेटम मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चर्चेसाठी येतील अशी शक्यता होती. मात्र, सरकारने रात्री उशिरा जालन्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि विखे पाटील यांचे ओएसडी राहुल कोठाडे यांना जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवले. वाचा सविस्तर
Source link
'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय':राधाकृष्ण विखे पाटलांचे मनोज जरांगेंना आवाहन; बोलतानाही पथ्य पाळण्याचा दिला सल्ला