Headlines

शेतकरी चळवळीतील आक्रमक नेत्यावर कारवाई:गजानन कावरखे हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे आदेश




क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा शेतकरी चळवळीतील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गजानन कावरखे यांना हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी नुकतेच दिले आहेत.शेतकरी चळवळीत खळबळ उडाली आहे. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कावरखे यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात सातत्याने आवाज उठविला. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी मोर्चे, रास्ता रोको, आंदोलनांसह अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे कर्जमाफी, पीकविमा, कृषी निविष्ठा, शेतमालाला योग्य भाव यांसह विविध प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामधून त्यांच्यावर आंदोलनाचे 14 गुन्हे दाखल झाले. मात्र त्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे सुरूच ठेवले होते. पोलिस विभागाने त्यांच्या विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावानुसार कार्यालयात सुनावली देखील घेण्यात आली. या सुनावणी नंतर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना हिंगोली जिल्ह्यातील एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या कारवाईमुळे शेतकरी चळवळी मधून एकच खळबळ उडाली आहे. केवळ राजकिय द्वेषापोटी ही कारवाई करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठविणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हद्दपार करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही,” अशी भूमिका संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली असून, या कारवाईविरोधात आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे. याशिवाय या कारवाईच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे पतंगे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *