Headlines

ढोल-ताशा वादकांच्या हाती आता जीवनरक्षणाचे कौशल्य:पुणे ढोल-ताशा महासंघ आणि आदर फाउंडेशनने दिले सीपीआर प्रशिक्षण




गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशा पथकांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. वादनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या तरुणांना आता जीवनरक्षक कौशल्ये शिकवण्यात आली आहेत. ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि आदर फाउंडेशनने पथकातील वादकांसाठी सीपीआर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. अचानक हृदयक्रिया बंद पडणे, बेशुद्ध होणे किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ महत्त्वाचा असतो. अशा वेळी तातडीने सीपीआर दिल्यास आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करता येतात. याच उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले. हे शिबिर पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिका येथे पार पडले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, कुमार रेणुसे, प्रकाश राऊत आणि डॉ. स्वानंद पाटील यांचा समावेश होता. याशिवाय, ढोल-ताशा महासंघाचे शिरीष थिटे, ढोल-ताशा महासंघ पुणे शहरचे कार्याध्यक्ष अभिजित कुमावत, उपाध्यक्ष अमर भालेराव, सचिव प्रशांत तांबे आणि आकाश जिंदम हे देखील उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात पथकातील वादकांना सीपीआर प्रणालीचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास किंवा व्यक्ती बेशुद्ध झाल्यास कोणती तातडीची मदत करावी, सीपीआर कसा द्यावा आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. अशा ठिकाणी प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. याच उद्देशाने वादकांना ढोल वाजवण्यासोबतच जीवनरक्षणाचे कौशल्य शिकवण्यात आले. नितीन पंडित यांनी सांगितले की, असे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. अनेकदा दुर्दैवी घटना घडतात, पण योग्य वेळी उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचायला वेळ लागतो, त्यामुळे प्राथमिक उपचाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, गणपती मंडळांमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. ढोल-ताशा पथकांमध्ये अनेक बदल झाले असले तरी, तरुण पिढी संस्कृती जपण्याचे काम करत आहे. पथकांमुळे तरुणांचे संस्कार अधिक दृढ होतात आणि वादक निस्वार्थपणे परंपरा पुढे नेत आहेत. पंडित यांनी सांगितले की, पथकांना पाठिंबा देणे हे मंडळांचे काम आहे. पथकांवर कोणतेही संकट आले तर मी त्यांच्यासोबत आहे. शिरीष मोहिते म्हणाले, ढोल-ताशा पथकांबद्दल अनेकदा वेगवेगळे बोलले जाते. पण पथकांनी केवळ बोलण्यापेक्षा आपल्या कामातून हे दाखवून दिले पाहिजे. पथकातील वादक फक्त ढोल वाजवत नाहीत, तर ते व्यसनांपासून दूर राहतात. तसेच, पथकांना मिळणारी बिदागी समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *