![]()
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला मालमत्ता कर कमी करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी सांगवी परिसरातील आनंदनगर येथे ही कारवाई केली. पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव उमेश सुभाष कुटे (वय ३७) आहे. तो पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील कर आकारणी आणि कर संकलन विभागीय कार्यालयात लिपिक म्हणून काम करतो. या प्रकरणी एका ५९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने पिंपळे गुरव येथील त्यांच्या जुन्या जागेवर तीन मजली इमारत बांधली आहे. या इमारतीचा मालमत्ता कर कमी करण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी महापालिकेच्या सांगवी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जासंदर्भात लिपिक कुटे याने तक्रारदाराशी संपर्क साधला. त्याने इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर ९१ हजार ४७२ रुपयांवरून ५० हजार रुपयांच्या आत आणून देण्याचे आश्वासन दिले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. या कामासाठी कुटे याने सुरुवातीला दीड लाख रुपयांची लाच मागितली. बोलणीनंतर ही रक्कम १ लाख ३० हजार रुपये ठरली. यानंतर तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी याची पडताळणी केली. लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी सापळा लावला. गुरुवारी सांगवीतील आनंदनगर येथील स्विमिंग टँक रस्त्यावर कुटे याने तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपये घेतले. त्याचवेळी तिथे लपून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Source link
महापालिका लिपिक मालमत्ता कर कमी करण्यासाठी लाच घेताना पकडला:1 लाख 20 हजार रुपयांसह सांगवीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई