![]()
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी डब्ल्यूपीयू) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलने विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले चित्रपट सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. हा महोत्सव कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ‘स्टुफी’च्या अधिकृत वेबसाइटचे अनावरणही करण्यात आले. या पत्रकार परिषदेला महोत्सवाचे संचालक अशोक राणे, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ. अरुण प्रकाश, डायरेक्टर डॉ. स्नेहा समद्दर आणि फिल्म फेस्टिव्हलचे प्रोग्राम हेड मंगेश मर्ढेकर उपस्थित होते. अशोक राणे हे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि नामांकित चित्रपट समीक्षक आहेत. अभिजित पानसे यांनी सांगितले की, सर्वोत्कृष्ट चित्रपटाला गोल्डन ट्रॉफी, प्रमाणपत्र, सुवर्ण पदक आणि १ लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल. यासोबतच विविध विभागांमध्येही पुरस्कार दिले जातील. महोत्सवात चित्रपट सादर करण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सहभागी होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील असावी. ३१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपट दिग्दर्शकाचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया १० सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे. निवडीसाठी अर्जदाराला चित्रपटाची ऑनलाइन प्रिव्ह्यू लिंक सादर करावी लागेल. सर्व चित्रपटांचा कालावधी जास्तीत जास्त २० मिनिटांचा असावा. महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी विविध स्पर्धा विभागांची माहिती दिली. यात फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- कथाप्रधान/फिक्शन), तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- कथाप्रधान/फिक्शन), फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- माहितीपट/ नॉन-फिक्शन), आंतरराष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- एआय/एआय सहाय्यित), आंतरराष्ट्रीय स्पर्धा (म्युझिक व्हिडिओ), फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्पर्धा (लघुपट- कथाप्रधान/फिक्शन) आणि ५ मिनिटांच्या चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा समावेश आहे. याशिवाय, विशेष स्क्रीनिंग ‘शॉर्ट्स टू लेजेंड्स’, उद्घाटनपर चित्रपट आणि समारोपपर चित्रपटही दाखवले जातील. प्रत्येक विभागाचे नियम व अटींची अधिक माहिती महोत्सवाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Source link
एमआयटी डब्ल्यूपीयूच्या दादासाहेब फाळके स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल:पहिला आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल; 31 ऑक्टोबरपर्यंत चित्रपट सादर करण्याचे आवाहन