Headlines

साताऱ्यात राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून शिजवले मांस:वनविभागाकडून आरोपीला बेड्या, वर्ये परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस




राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा रचून शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवून मेजवानी मारणाऱ्या एका संशयिताला सातारा वनविभागाने तातडीने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. सागर गौतम पवार (वय वर्षे 25, रा. वर्ये , ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ये परिसरामध्ये मोराची शिकार झाल्याची खबर मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान आरोपीने मोरास सापळ्यात पकडून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता, दोन पातेल्यांमध्ये शिजवलेले मांस, मोराची पिसे, दोन पाय आणि शिकार करण्यासाठी वापरलेला सापळा मिळून आला. याशिवाय तीन छोटे सुरे, मोठा सत्तूर, विळीचा लाकडी पाट आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. मोर हा वन्यजीव (संरक्षण) अनुसूची मधील अत्यंत संरक्षित वन्यप्राणी आहे. त्यामुळे मोराची शिकार करणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. जप्त केलेले अवशेष आणि मांस पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सदरची यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनपरिक्षेत्र आणि फिरत्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी विभागात गस्त अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *