Headlines

सिंहगड कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंत्री पाटील यांच्या आश्वासनानंतर स्थगित:भारतीय मजदूर संघाने शिक्षक दिनाचे धरणे आंदोलन तात्पुरते थांबवले; 13 सप्टेंबर 2026 ला बैठक




सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 20 महिन्यांहून अधिक काळाचे वेतन थकीत आहे. या गंभीर प्रश्नावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनी मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर आयोजित धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी ही माहिती दिली. या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सागर पवार, अनिकेत जाधव, औदुंबर ताठे आणि शुभम फालके उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी “सिंहगड संस्थेतील कर्मचाऱ्यांना निश्चितच न्याय देण्यात येईल,” असे आश्वासन दिले. या प्रश्नावर संबंधित सर्व पक्षांची एक महत्त्वाची बैठक 13 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय मजदूर संघाने स्पष्ट केले की, आंदोलन स्थगित करणे ही माघार नाही. तर शासनाच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रश्नाच्या सकारात्मक तोडग्यासाठी दिलेली ही एक संधी आहे. बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले की, जर त्रिपक्षीय बैठकीत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर या संस्थेवर प्रशासक नेमावा आणि शासन मान्यता काढून घेऊन कामगारांना न्याय द्यावा. सिंहगड संस्थेतील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 20 महिन्यांहून अधिक काळाचे वेतन अजूनही मिळालेले नाही. यामुळे अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट आले आहे. या परिस्थितीमुळे आतापर्यंत 13 कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचा गंभीर आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. कर्मचारी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ थकीत वेतन, पी.एफ. आणि इतर हक्कांसाठी आंदोलन व सत्याग्रह करत आहेत. संघटनेने म्हटले आहे की, 2016 पासून पी.एफ. संदर्भात अनियमितता, पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार संपूर्ण वेतनाचा लाभ, प्रलंबित 56 टक्के महागाई भत्ता तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व वैध सेवानिवृत्ती लाभ हे प्रमुख प्रश्न आहेत. भारतीय मजदूर संघाने शासनाकडे 20 महिन्यांचे थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी केली आहे. तसेच, सर्व प्रलंबित आर्थिक आणि सेवा विषयक प्रश्नांवर वेळेत निर्णय घेण्याची मागणीही केली आहे. भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी इशारा दिला आहे की, 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत ठोस आणि न्याय्य निर्णय झाला नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवून अधिक तीव्र लढा उभारण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *