![]()
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ना हरकत दाखला’ देण्याच्या मोबदल्यात 1,200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पांडुरंग वासुदेव नाटेकर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, एसीबीच्या या कारवाईमुळे कुडाळ नगरपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराला कुडाळ शहरात ‘पदमगड ज्वेलर्स’ नावाचा नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी नगरपंचायतीकडे ना हरकत दाखला मिळवण्यासाठी रीतसर अर्ज केला होता. मात्र, हा दाखला मंजूर करून देण्यासाठी स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी चक्क 1,200 रुपये किमतीच्या खड्याच्या चांदीच्या अंगठीची लाच म्हणून मागणी केली. तक्रारदाराची ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीचा सापळा तक्रारदाराने दिलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर एसीबीच्या पथकाने कुडाळ नगरपंचायत परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाच देण्यासाठी गेले असता, पांडुरंग नाटेकर यांनी त्यांच्याकडून चांदीची अंगठी स्वीकारताच दबा धरून बसलेले एसीबीचे पथक समोर आले. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आपण जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच आणि समोर पोलिसांना पाहताच संशयित नाटेकर यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ती अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, लाचेच्या वस्तूंवर वापरण्यात आलेली अँथ्रोसिन पावडर नाटेकर यांच्या हातावर स्पष्टपणे चमकल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल या कारवाईनंतर संशयित पांडुरंग नाटेकर यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारणा 2018) आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 238 अन्वये (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.
Source link
कुडाळ नगरपंचायतीत एसीबीची कारवाई:1200 रुपयांच्या चांदीच्या अंगठीची लाच घेणारा स्वच्छता निरीक्षक जाळ्यात