![]()
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेली परंपरा आणि ठाण्याच्या गोविंदा संस्कृतीची ओळख असलेल्या टेंभी नाका येथील मानाच्या दहीहंडी उत्सवात यंदाही प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या दहीहंडीला सलामी देण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला. “हंडी फोडा, पण माणूस जपा,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी उत्सवातील थरांपेक्षा गोविंदांमधील एकजूट, शिस्त आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. टेंभी नाक्याची दहीहंडी ही केवळ स्पर्धा नसून ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीची मानाची खूण असल्याचे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, “ठाणे ही गोविंदांची पंढरी आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जपलेली ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.” राज्य सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा, सार्वजनिक सुट्टी, गोविंदांचा विमा आणि ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून या परंपरेला संस्थात्मक पाठबळ दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सुरक्षा अन् शिस्तीचा संदेश दहीहंडी हा एकजुटीचा आणि टीमवर्कचा उत्सव असल्याचे सांगताना शिंदे यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर भर दिला. “घरचे आई-वडील तुमची वाट पाहत आहेत. दहीहंडी ही जीवघेणी स्पर्धा नसून संस्कृती जपण्याचा उत्सव आहे. थर किती उंच गेला यापेक्षा प्रत्येक गोविंदा सुरक्षित राहिला का, हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी उत्साहासोबत संयम बाळगण्याचे आवाहन केले. टेंभी नाका मित्रमंडळाच्या वतीने सर्व गोविंदा पथकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. राजकीय घडामोडी अन् कलाकारांची मांदियाळी या सोहळ्यात उबाठा गटाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याशिवाय अभिनेते गोविंदा, सिद्धार्थ जाधव आणि दत्तू मोरे या कलाकारांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, जॅकी भोईर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भावनिक आवाहन:म्हणाले- हंडी फोडा, पण माणूस जपा; थरांपेक्षा गोविंदांची सुरक्षितता महत्त्वाची