![]()
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत (एसआयआर) बडनेरा विधानसभा मतदारसंघातील ७५ हजार ६३७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नवीन मतदार यादी तयार करताना, यापैकी अनेक मतदार त्यांच्या जुन्या पत्त्यावर सापडले नाहीत. त्यामुळे त्यांची नावे नवीन यादीत समाविष्ट झाली नाहीत, असे सरकारी यंत्रणांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ३१ ऑगस्ट रोजी नवीन मतदार यादीचा मसुदा जाहीर करण्यात आला. त्यानंतर ही माहिती समोर आली. एकाच मतदारसंघातून एवढ्या मोठ्या संख्येने नावे कमी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मतदार नोंदणी अधिकारी आणि महसूलचे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी सांगितले की, वगळलेल्या मतदारांचे यादीतील पत्ते आणि त्यांचे प्रत्यक्ष वास्तव्य जुळत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. सरकारी यंत्रणेतील बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) आणि विविध राजकीय पक्षांनी नेमलेल्या बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांनी संबंधित मतदारांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरभेटी आणि इतर संपर्क माध्यमांचा वापर करूनही ४७ हजार ८९० मतदारांशी थेट संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे गणना अर्ज वेळेत यंत्रणेपर्यंत पोहोचले नाहीत. मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात प्रत्येक मतदाराचा किंवा त्यांच्या कुटुंबप्रमुखाच्या स्वाक्षरीने गणना अर्ज मिळणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नावे यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत, असे वारंवार सांगण्यात आले होते. तरीही संबंधित मतदारांनी निर्धारित वेळेत आपले गणना अर्ज भरले नाहीत. घरभेटीच्या वेळी ते घरी न मिळाल्याने बीएलए किंवा बीएलओमार्फत यंत्रणेशी संपर्क साधून अर्ज भरता आला असता, पण तसेही झाले नाही. त्यामुळे ती नावे वगळण्याशिवाय यंत्रणेकडे दुसरा पर्याय नव्हता, असे जाधव यांनी स्पष्ट केले. वगळण्यात आलेले मतदार बडनेरा विधानसभा मतदारसंघातील ३४५ गावे आणि अमरावती शहरात वास्तव्यास होते. ज्या मतदारांना तीन वेळा घरभेटी देऊनही त्यांच्या मूळ पत्त्यावर शोधता आले नाही, त्यांना ‘असंग्रहित’ मतदारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. यात मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक, अनुपस्थित मतदार आणि दुबार नोंदणी असलेले मतदार असण्याची शक्यता आहे. तरीही, जर कोणताही पात्र मतदार वगळला गेला असेल, तर त्यांना आगामी ३० सप्टेंबरपर्यंत आपले नाव पुन्हा नोंदवता येणार आहे.
Source link
बडनेरा मतदारसंघातून 75 हजार मतदारांची नावे वगळली:निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेत पत्त्यावर न आढळल्याने नव्या यादीत समावेश नाही; 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी