![]()
वाढत्या जल व वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना निसर्ग संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने रेसिडेन्शिअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शेवगाव येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “दिव्य मराठी’च्या सहकार्याने व विद्यालयाच्या हरित सेना विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात ५७८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पीओपीच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे जलस्रोत दूषित होऊन जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.द कार्यशाळेत कलाशिक्षक शंभुराजे पोपळघट, शिवाजी उदागे आणि पोपट घाडगे यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती घडविण्याच्या विविध पद्धती, मूर्तीची प्रमाणबद्धता तसेच माती हाताळण्याचे बारकावे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने माती मळून आराध्य दैवत साकारण्याचा आनंद घेतला. बाजारातील पीओपीच्या तयार मूर्तीपेक्षा स्वतः तयार केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामध्ये अधिक आत्मीयता आणि समाधान असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शाडू मातीची मूर्ती घरच्या घरी बादलीत किंवा बागेत सहज विसर्जित करता येते. त्यामुळे जलप्रदूषण टाळण्यास मदत होते. प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून करण्यात आला. कार्यशाळेचे समन्वयक सचिन दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. प्राचार्य बालाजी गायकवाड, उपमुख्याध्यापक अविनाश रामफळे आणि पर्यवेक्षक महेश शिंदे यांनी सहभागी विद्यार्थी व संयोजकांचे कौतुक केले. पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
Source link
शेवगावच्या रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती निर्मिती:578 विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक बाप्पा