Headlines

भेंडवळच्या घटमांडणीला अंनिसचे आव्हान:श्याम मानव म्हणाले – 10 कुंडल्यांचे 90% अचून भविष्य वर्तवा अन् 80 लाख घ्या




अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळच्या पाऊस व हवामानाविषयी अंदाज वर्तवणाऱ्या घटमांडणीला आव्हान दिले आहे. आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. घटमांडणी करणाऱ्यांनी त्याची 90 टक्क्यांहून अधिक अचूक भविष्यवाणी करून दाखवावी. असे केले तर त्यांना 80 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दरवर्षी घटमांडणीद्वारे वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येते. नुकतीच ही घटमांडणी जारी करण्यात आली. त्यात देशाच्या सद्यस्थितीवर विविध भाष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांनी या घटमांडणीला आव्हान दिले आहे. ते म्हणाले, मागील 5 वर्षांत ह्या घटमांडणीचे कोणतेही अंदाज खरे ठरले नाहीत. वारंवार त्याच त्या गोष्टी फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटमांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. ही घटमांडणी करणाऱ्यांना आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. त्यांनी त्याचा 90 टक्क्यांहून अधिक अचूक अंदाज वर्तवून दाखवावा. असे केले तर आम्ही त्यांना तब्बल 80 लाख रुपयांचे बक्षीस देऊ. आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित आहेत. त्या विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून पाहता येतात. पण भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तेवढी शास्त्रीय पडताळणी नाही. पूर्वी शेतकरी अनुभवानुसार निर्णय घेत होते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलली. लोकांना फसवण्यासाठी आता श्रद्धेचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रथांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे, असे श्याम मानव म्हणाले. भेंडवळची भविष्यवाणी आजच जाहीर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी तिचे अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार, देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील. पण ते कायम तणावात राहतील. देशाची संरक्षण स्थितीही कमकुवत राहील. त्याचा संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल. शेतकऱ्यांना हे वर्ष अडचणीचे ठरू शकते. यंदा सर्व पिकांवर रोगराईचे सावट राहील. पण कापूस व तीळ मोठ्या प्रमाणात पिकेल. त्यांना चांगला भावही मिळेल. ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण येतील. श्याम मानवांचा भोंदूबाबांवरही संताप व्यक्त उल्लेखनीय बाब म्हणजे श्याम मानव यांनी रविवारीच नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला होता. तसेच एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठीच हे प्रकरण पुढे आणल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, एकनाथ शिंदेंमुळे आज अशोक खरात घरोघरी पोहोचले आहे. खरात हा शिंदेंचा बाबा नसता आणि रुपाली चाकणकर त्याची भक्त नसती, तर हे प्रकरण केव्हाच समोर आले नसते. कदाचित पोलिसांना सुरुवातीलाच हे प्रकरण दाबण्याच्या सूचना मिळाल्या असत्या. पण शिंदे व राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी पोलिसांना हे प्रकरण उत्तमपणे हाताळण्याच्या सूचना मिळाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *