![]()
पर्युषण पर्व म्हणजे केवळ धार्मिक अनुष्ठान नव्हे, तर माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनविणारा क्षमा आणि मैत्रीचा उत्सव आहे. मानवतेची ओळखच क्षमाशीलता आणि मैत्रीभावात आहे,असे निरुपण उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी यांनी केले. आनंद तीर्थ समवशरण येथे समर्पण चातुर्मास २०२६ अंतर्गत सुरू झालेल्या पर्युषण पर्वाच्या अनुष्ठानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साधू-साध्वींच्या सान्निध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. शुभ्र वस्त्रांतील भाविक, भक्तीमय वातावरण, साधू-साध्वींचे सान्निध्य आणि तप-साधनेचा जागर… राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पावन भूमीत पर्युषण पर्वाचा मंगलारंभ झाला. आनंद तीर्थ समवशरण येथे सुरू झालेल्या या महामंगलकारी अनुष्ठानाने अहिल्यानगरमध्ये धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले आहे. महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी, उपाध्यायश्री पूज्य प्रविणऋषीजी, पूज्य आलोकऋषीजी, पूज्य तिर्थेशऋषीजी, पूज्य सत्यप्रभाजी, पूज्य अमितज्योतीजी आदी साधू साध्वीजींच्या पावन सान्निध्यात पयुर्षण पर्व अनुष्ठानास प्रारंभ झाला. याप्रसंगी समर्पण चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया, कार्याध्यक्ष राजेश भंडारी, कोषाध्यक्ष विलास कटारिया, उपाध्यक्ष अनिल पोखरणा, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसरडा, मनसुख गुंदेचा, अभय गांधी, अभिजीत गांधी उपस्थित होते. समर्पण चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी उद्योगपती तिरूपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, राखी बोरा, प्रमिलाबाई बोरा, पराग बोरा व बोरा परिवार आहे. प्रविणऋषीजी महाराज म्हणाले, ज्यावेळी भूक लागली तरी आहार घेत नाही, त्यावेळी तप होते. तपामुळे जुनी पापे नष्ट होतात. म्हणूनच जैन धर्मात तपसाधनेला विशेष महत्त्व आहे. तीर्थंकरांनी शाश्वत पर्वाची व्यवस्था केली आहे. संवत्सरी हे न्यू हॅपी इयर आहे; मात्र ते कोणत्याही कॅलेंडरचे नव्हे, तर मानवतेचे आहे,’ असे सांगत त्यांनी पर्युषण पर्वाचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. हे पर्व आत्मशुद्धी, कृतज्ञता आणि परमात्म्याशी असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचे पर्व असल्याचे त्यांनी सांगितले. पर्युषण काळात संयम, तप, जप, आराधना आणि आत्मचिंतनातून जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. प्रत्येकाने क्षमा आणि मैत्रीचा स्वीकार करून मानवतेची मूल्ये जपावीत, असे आवाहनही प्रविणऋषीजी महाराज यांनी केले. पूज्य आलोकऋषीजी महाराज यांनी पर्युषण हे आत्म्याला शृंगारण्याचे लोकोत्तर पर्व असल्याचे सांगितले. या काळात नित्य प्रवचन, कल्पसूत्र वाचन, प्रतिक्रमण, जप, आराधना, व्रत नाटिका व भक्ती संध्या आदी कार्यक्रम होणार आहेत. समर्पण चातुर्मास समितीच्या वतीने तपस्वींचा सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष अशोक बोरा यांनी चातुर्मासामुळे भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले. महाराष्ट्रासह देशभरातून भाविक तपसाधनेसाठी अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. शेवटी पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांच्या मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Source link
महामंगलकारी अनुष्ठान:पर्युषण पर्व म्हणजे माणसाला माणूस बनवणारा क्षमा अन् मैत्रीचा उत्सव, उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी यांचे निरुपण