Headlines

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जादा पैसे मागितले तर कॉलेजवर थेट कारवाई:सीईटी सेलचा इशारा, नियमबाह्य प्रवेशही रद्द होणार




अभियांत्रिकी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून मंजूर शुल्कापेक्षा अतिरिक्त रक्कम आकारणाऱ्या महाविद्यालयांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. शुल्काच्या नावाखाली पालकांकडून रोख रक्कम किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अवाजवी पैशांची मागणी केल्यास संबंधित संस्था अडचणीत येणार आहे. अशा संस्थांमधील नियमबाह्य प्रवेशही रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पालक तसेच काही लोकप्रतिनिधींनी राज्यातील काही महाविद्यालयांकडून अतिरिक्त आणि नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी सीईटी सेल आणि संबंधित यंत्रणांकडे केल्या आहेत. पुण्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मंजूर शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त रक्कम मागितल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने सर्व अभियांत्रिकी संस्थांना शुल्क आकारणीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. मंजूर शुल्कापेक्षा एक रुपयाही जादा घेता येणार नाही शुल्क नियामक प्राधिकरणाकडून प्रत्येक संस्थेसाठी शुल्क निश्चित केले जाते. त्यामुळे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त रक्कम घेणे बेकायदेशीर असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त रोख स्वरूपात रक्कम मागणे, इतर शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेणे किंवा प्रवेशाच्या वेळी पालकांवर अवाजवी आर्थिक भार टाकणे याला परवानगी नाही. संस्थांनी केवळ प्राधिकरणाने अधिकृतपणे मंजूर केलेले शुल्कच विद्यार्थ्यांकडून वसूल करणे बंधनकारक आहे. शुल्काचा मंजुरी आदेश वेबसाइटवर लावणे बंधनकारक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शुल्काबाबत पारदर्शक माहिती उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित संस्थांनी शुल्क नियामक प्राधिकरणाचा अधिकृत मंजुरी आदेश आपल्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रकाशित करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबंधित अभ्यासक्रमासाठी नेमके किती शुल्क मंजूर आहे, याची माहिती सहज मिळू शकणार आहे. मंजूर शुल्क आणि प्रत्यक्ष मागितली जाणारी रक्कम यामध्ये तफावत आढळल्यास पालकांना त्याची तक्रार करता येणार आहे. नियमबाह्य शुल्क घेतल्यास संस्थेवर काय कारवाई होणार? सीईटी सेलने स्पष्ट केले आहे की, कोणतीही संस्था मंजूर नसलेले किंवा नियमबाह्य शुल्क आकारताना आढळल्यास तिच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. एवढेच नव्हे, तर अशा संस्थांमध्ये नियमबाह्य पद्धतीने झालेले प्रवेशही रद्द करण्यात येऊ शकतात. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे मागणाऱ्या महाविद्यालयांना आता सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालकांनीही प्रवेशाच्या वेळी मागितले जाणारे शुल्क अधिकृत मंजुरी आदेशाशी तपासून पाहावे, असे या निर्णयातून स्पष्ट होते. अभियांत्रिकी प्रवेशाच्या काळात पालकांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना सीईटी सेलच्या या निर्देशामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक ठेवणे आणि मंजूर शुल्कापेक्षा अधिक रक्कम विद्यार्थ्यांकडून वसूल होऊ न देणे, हा या निर्देशामागील मुख्य उद्देश आहे. ————- हेही वाचा… अमृता फडणवीस म्हणाल्या- जरांगे माझे भाऊ, त्यांनी घरी जेवायला यावे: मराठा आंदोलनादरम्यान दिले निमंत्रण; गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाचे केले होते समर्थन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आपला भाऊ म्हटले आहे. बुधवारी रात्री नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर त्या म्हणाल्या- जरांगेजी माझे भाऊ आहेत. ते माझ्या घरी जेवायला यावेत अशी माझी इच्छा आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *