Headlines

वसमत शहरात तरुणाचा दगडाने ठेचून खून:आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी जमावाचा शहर पोलिस ठाण्यात ठिया




वसमत शहरामध्ये सोमवार पेठ भागात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांच्या जमावाने गुरुवारी ता 10 वसमत शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याचा खून झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरात दिगंबर गुंडाळे हे कुटुंबासह राहतात. गुंडाळे यांचा फळे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना गणेश गुंडाळे हा एकुलता एक मुलगा आहे. गणेश हा काही दिवसापूर्वीच गावी पूर्णा येथे गेला होता. त्या ठिकाणी काम आटपून तो वसमत शहरात आला होता. दरम्यान बुधवारी ता 9 रात्रीच्या सुमारास गणेश हा त्याच्या मित्रासह सोमवार पेठ येथे वस्तू आणण्यासाठी गेला होता. यावेळी तिघांनी त्याला बाजूला बोलावून नेले. त्यानंतर त्याच्याशी वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे गणेश घाबरून गेला त्याला मदतीसाठी आरडा ओरड देखील करता आली नाही. काही वेळातच गणेश कुठे गेला हे पाहण्यासाठी त्याचा मित्र पवन याने शोध सुरू केला. यावेळी तिघे जण त्याला मारहाण करत असल्याचे दिसून आले. दरम्यान पवन याला पाहतात मारहाण करणारे पळून गेले. यावेळी रक्ताने माखलेल्या गणेश याला तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणेश याच्या चेहऱ्यावर व इतर शरीरावर दगडाचे वार असल्यामुळे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गणेश याच्या कुटुंबीयासह नागरिकांनी वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. गणेश याचा मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली. गुरुवारी तारीख 10 सकाळी नागरिकांची पोलिस ठाण्यात गर्दी कायम होती. काही दिवसापूर्वी गणेश यांनी एका तरुणाकडे पिस्टल असल्याची टीप पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याचा खून झाल्याची चर्चा वसमत शहरात सुरू झाली आहे. या घटनेमुळे वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान वसमतचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ पोरगेवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पवन डाखोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत पोलिसांनी ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी अनिकेत देवकर या तिघांविरुद्ध गुरुवारी ता 10 खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *