![]()
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे की, बाजीराव पेशव्यांचा इतिहास शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिकवला गेला नाही. ब्रिटिशांच्या आणि मुघलांच्या इतिहासावर भर दिला गेला, पण बाजीरावांचा इतिहास दुर्लक्षित राहिला, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो. कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर, मएसो सभागृहात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते धनोआ यांना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, प्रमुख वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, मोरेश्वर गांगल, उमेश देशमुख आणि चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते. पुरस्कारात सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि २५ हजार रुपये रोख रक्कम होती. हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले की, आज आपल्याला बाजीरावांसारखे होणे शक्य नाही. आता तलवारीची लढाई नसून, बुद्धीची लढाई आहे. त्यामुळे शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गरिबी दूर करण्याचे शिक्षण हे एक प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. बीरेंद्र सिंह धनोआ यांनी सांगितले की, आपल्या देशातील लष्करी कमांडर्सबद्दल काहीच शिकवले गेले नाही. आपण बाजीराव पेशव्यांबद्दल शिकलो नाही. भारतावर ब्रिटिशांनी २०० वर्षे राज्य केले, पण आपण त्याबद्दल रडत बसण्याऐवजी आपण का हरलो आणि या अवस्थेपर्यंत का पोहोचलो, हे मुलांना शिकवले पाहिजे. आपले सैनिक नेहमीच शूर आणि धाडसी होते, पण आपण एकत्र नव्हतो, आपापसातच लढत होतो, असेही ते म्हणाले.
Source link
बाजीराव पेशव्यांचा इतिहास योग्य पद्धतीने शिकवला नाही:राज्यपाल हरिभाऊ बागडेंची खंत; धनोआ यांना शौर्य पुरस्कार प्रदान