![]()
ब्रिटनच्या ऐतिहासिक हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली. ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी भाषणाची सुरुवात करत शिंदे यांनी मराठी अस्मितेपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत अनेक मुद्दे मांडले. त्यानंतर त्यांनी सलग इंग्रजीत केलेल्या भाषणातून महिला सक्षमीकरण, नागरिक-केंद्रित प्रशासन, सामाजिक न्याय, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि ब्रिटनसोबतच्या भविष्यातील सहकार्याचा आराखडा मांडला. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये झालेल्या विशेष सोहळ्यात शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या सन्मानाने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून नागरिक-केंद्रित, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धती राबवल्याबद्दल हा सन्मान देण्यात आल्याचे मानपत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा उल्लेख त्यात करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर आणि बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे, ब्रिटिश संसद सदस्य, वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते. मी मुख्यमंत्री नाही, मी कॉमन मॅन भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची ओळख ‘सामान्य माणूस’ अशी करून दिली. मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असली तरी आपण स्वतःला सामान्य माणूसच मानतो आणि आता उपमुख्यमंत्री म्हणूनही सामान्य नागरिकांसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. “DCM म्हणजे Dedicated to Common Man”, अशी शब्दांची कोटी करत त्यांनी आपल्या प्रशासनाच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. चांगल्या प्रशासनाची खरी कसोटी ही दुर्बल आणि सामान्य माणसाचे सक्षमीकरण करण्यात आहे, हा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा विचारही त्यांनी उद्धृत केला. ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी राज्याची खरी ताकद ही त्या राज्यातील नागरिकांच्या प्रगतीत असते, असे सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजनेचा हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उल्लेख एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सर्वाधिक भर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेवर दिला. स्वतःची एक बहीण असल्याचा उल्लेख करत, या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांशी आपले ‘बहिणीचे’ नाते जोडले गेल्याचे त्यांनी सांगितले. कमी उत्पन्न गटातील महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते. “ही धर्मादाय मदत नाही, तर महिलांच्या स्वाभिमान, आर्थिक स्वावलंबन आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला बळ देणारी योजना आहे,” असा युक्तिवाद शिंदे यांनी केला. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर त्याचा फायदा केवळ महिलेला होत नाही, तर संपूर्ण कुटुंबाला होतो. आरोग्य, पोषण, मुलांचे शिक्षण आणि घरगुती खर्चाच्या निर्णयांमध्ये महिलांची भूमिका मजबूत होते, असे त्यांनी सांगितले. या आर्थिक मदतीमुळे काही महिलांना छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली असून त्यातून स्थानिक बाजारपेठा आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही चालना मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे यांच्या भाषणानुसार, या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यांमध्ये £6.15 अब्जपेक्षा अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अभ्यासाचा संदर्भ देत लाभार्थी महिलांच्या सरासरी बँक शिल्लक रकमेत 84% वाढ झाल्याचे आणि आरोग्य, शिक्षण व पोषणावरील खर्चात 46% वाढ झाल्याचे सांगितले. त्यांच्या मते, महिलांना आर्थिक ताकद मिळाल्यास कुटुंब, समाज आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. शासन आपल्या दारी’चा दाखला शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचाही हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उल्लेख केला. सरकारी कार्यालयांमध्ये साधे दाखले आणि विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा वेळ आणि उत्पन्न गमवावे लागत होते. ही पद्धत बदलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावागावांत आणि स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करून सरकारी सेवा आणि योजनांचे लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. त्यांच्या भाषणानुसार, या उपक्रमातून 5 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचे लाभ मिळाले. “केवळ प्रशासन कार्यक्षम असणे पुरेसे नाही; ते नागरिक-केंद्रित असले पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला. या उपक्रमाची इतर राज्यांनीही दखल घेतली असून काही राज्यांनी या मॉडेलचा अभ्यास करून त्याचा स्वीकार केल्याचा दावा शिंदे यांनी केला. या उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार आणि स्कॉच पुरस्कार मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. आईच्या नावाचा उल्लेख का महत्त्वाचा? महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील आणखी एका निर्णयाचा उल्लेख केला. सरकारी कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावासोबत वडिलांचे नाव आणि आडनाव असते. मात्र, आईचे नावही सरकारी कागदपत्रांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आईचे योगदान केवळ कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता तिची ओळख आणि सन्मान अधिक ठळक व्हावा, या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. “जगातील कदाचित पहिल्या राज्यांपैकी महाराष्ट्राने असा बदल केला,” असा उल्लेख त्यांनी केला. याच संदर्भात शिंदे यांनी स्वतःच्या आई आणि पत्नीच्या कष्टांचा उल्लेख केला. आई आणि पत्नीच्या कष्टांमधून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची आपली विचारसरणी घडली, असे त्यांनी सांगितल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठीही योजनांचा उल्लेख समाजातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये, अशी भूमिका मांडताना शिंदे यांनी महाराष्ट्रातील सामाजिक कल्याणाच्या विविध निर्णयांचा उल्लेख केला. महाराष्ट्राने दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र तृतीयपंथी धोरण 2024 मंजूर करण्यात आल्याचा उल्लेख करत समान हक्क आणि सन्मान देण्याच्या राज्याच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. गंभीर आजारामुळे गरीब कुटुंब आर्थिक संकटात जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या मदतीचा आकडा £36 दशलक्षपेक्षा अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल आणि मेट्रो नव्हे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विकासाची व्याख्याही मांडली. मोठे रस्ते, आधुनिक पूल, मेट्रो, गगनचुंबी इमारती किंवा पायाभूत सुविधा म्हणजेच विकास नव्हे, असे त्यांनी सांगितले. “खरा विकास म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचणे, गरजू व्यक्तींना आधार मिळणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राने सामाजिक कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचा दावाही त्यांनी केला. मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च सरकार उचलत असल्याने सुमारे 2.5 लाख मुलींना त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासाचा लंडनमध्ये डंका सामाजिक योजनांनंतर शिंदे यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाचा मुद्दा मांडला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या 7.9% वार्षिक दराने वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताच्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या प्रत्येक 7 रुपयांपैकी 1 रुपया महाराष्ट्रातून येतो, असेही त्यांनी नमूद केले. मागील वर्षात महाराष्ट्राने सुमारे £13.62 अब्ज थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित केल्याचा दावा करत, भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास एकतृतीयांश गुंतवणूक महाराष्ट्राकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्टअप्स, निर्यात, जीएसटी संकलन आणि बँक ठेवींमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, केवळ देशात पहिल्या क्रमांकावर समाधान मानायचे नसून 2030 पर्यंत महाराष्ट्राला भारतातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. हा विकासाचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या व्यापक उद्दिष्टाशी जोडत महाराष्ट्र या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे शिंदे यांनी म्हटले. मुंबई-लंडन सहकार्यावर भर भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनमधील उद्योग आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुंबई आणि लंडन ही जगातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे आहेत, असे सांगत या दोन शहरांमध्ये आणि महाराष्ट्र-ब्रिटनमध्ये आर्थिक व तांत्रिक सहकार्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रीन एनर्जी आणि शाश्वत पायाभूत सुविधा, फिनटेक आणि डीप-टेक स्टार्टअप्स, तसेच शिक्षण आणि कौशल्य विकास ही तीन महत्त्वाची क्षेत्रे त्यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्रात मेट्रो, बुलेट ट्रेन, ऑटोमोबाईल, संरक्षण, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटनमधील उद्योगांनी महाराष्ट्रासोबत काम करून या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. मराठी कवितेने ब्रिटिश संसदेत महाराष्ट्राची ओळख इंग्रजी भाषण करत असतानाही शिंदे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेची ओळख ठळकपणे मांडली. प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या कवितेचा उल्लेख करत त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला. भाषणाच्या सुरुवातीला ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांनी मराठी अस्मितेची जाणीव करून दिली. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी सभागृहात वातावरण भारावून गेले. अशा प्रकारे एका बाजूला मराठी भाषेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान व्यक्त करताना दुसऱ्या बाजूला त्यांनी सलग इंग्रजीतून राज्याच्या विकासाचे आणि प्रशासनाच्या मॉडेलचे सादरीकरण केले. पुरस्कार महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला समर्पित हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा सन्मान असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी आगामी दशक महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगत, दोन्ही देशांमधील भागीदारी केवळ सरकारांपुरती मर्यादित न राहता नागरिक, उद्योग, युवा आणि विविध संस्थांच्या सहभागातून पुढे जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अखेर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला. हाऊस ऑफ लॉर्ड्ससारख्या ऐतिहासिक सभागृहात मिळालेला सन्मान, मराठी भाषेतील अभिमानाची सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष आणि त्यानंतर इंग्रजीतून महाराष्ट्राच्या विकासाचा मांडलेला विस्तृत आराखडा, यामुळे एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यातील हा कार्यक्रम विशेष चर्चेचा ठरला आहे. ———- हेही वाचा…. अमृता फडणवीस म्हणाल्या- जरांगे माझे भाऊ, त्यांनी घरी जेवायला यावे: मराठा आंदोलनादरम्यान दिले निमंत्रण; जरांगे म्हणाले- भाऊबीजेला नक्की जाऊ, भाऊ संकटात पडेल असे करू नये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आपला भाऊ म्हटले आहे. बुधवारी रात्री नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर त्या म्हणाल्या- जरांगेजी माझे भाऊ आहेत. ते माझ्या घरी जेवायला यावेत अशी माझी इच्छा आहे. जरांगे गेल्या 13 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. जरांगे ओबीसी आरक्षणासोबतच हैदराबाद आणि सातारा गॅझेटमधील नोंदी लागू करण्याची आणि पात्र मराठा लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचीही मागणी करत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा डंका:एकनाथ शिंदेंचे इंग्रजीत तडाखेबंद भाषण; महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला पुरस्कार केला समर्पित