![]()
ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गेल्या काही वर्षांत अधिक चर्चेत आला आहे. शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थैर्य आणि बदलत्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांचे लग्न उशिरा होत असल्याचे चित्र आहे. याच प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका 28 वर्षीय तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. ‘कुणी लग्नासाठी मुलगी देता का?’ असा सवाल करत हा तरुण चक्क जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसला आहे. मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील किसनदेव दत्तात्रेय ननावरे असे या तरुणाचे नाव आहे. किसनदेव यांच्याकडे सुमारे अर्धा एकर शेती असून ते सध्या बेरोजगार आहेत. शेतकरी आणि बेरोजगार तरुण असल्यामुळे लग्न जमत नसल्याची व्यथा त्यांनी आंदोलनातून मांडली आहे. विशेष म्हणजे नवरदेवाप्रमाणे फेटा आणि मुंडावळ्या घालून त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर आंदोलन केले. त्यांच्या या वेगळ्या आंदोलनाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. लग्नासाठी सरकारने मदत करावी किसनदेव ननावरे यांनी केवळ स्वतःच्या लग्नाचा प्रश्न मांडलेला नसून, ग्रामीण भागातील शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या विवाहाचा मुद्दा सरकारसमोर ठेवला आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेक तरुणांना लग्नासाठी अडचणी येतात. त्यामुळे अशा तरुणांसाठी सरकारने विशेष योजना सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. आज अनेक मुली आणि त्यांचे पालक शिक्षित, नोकरी करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या तरुणांना पसंती देतात. दुसरीकडे ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी, बेरोजगार किंवा छोटा व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती आणि अपेक्षांमधील तफावतीचा परिणाम विवाह जुळण्यावर होत असल्याचे किसनदेव यांनी आंदोलनातून सांगितले. ‘सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र’ सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना विवाहासाठी योग्य स्थळ उपलब्ध व्हावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. हे केंद्र ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावे, अशीही त्यांची मागणी आहे. याशिवाय विवाह करणाऱ्या पात्र तरुणांना सरकारने 1 लाख रुपयांचे लग्न अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. लग्नानंतर निवाऱ्याची अडचण दूर करण्यासाठी २ लाख रुपयांचे घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. व्यवसायासाठी 2 लाखांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सरकारने 2 लाख रुपयांचे बिनव्याजी आणि विनाजामीनदार कर्ज द्यावे, अशी आणखी एक मागणी किसनदेव यांनी केली आहे. या कर्जातून तरुणांना छोटा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करता येईल, असा त्यांचा दावा आहे. मुलींच्या घटत्या संख्येचाही मुद्दा चर्चेत ग्रामीण भागातील विवाहाचा प्रश्न मांडताना मुला-मुलींच्या संख्येतील असमतोलाचाही मुद्दा पुढे येत आहे. मुलगा हवा, वंशाला दिवा हवा या मानसिकतेमुळे मुलींच्या जन्माबाबत भेदभाव झाल्याने काही भागांत मुलींची संख्या कमी झाल्याचे सामाजिक वास्तव आहे. याचा परिणाम विवाहाच्या वयात आलेल्या तरुणांच्या पिढीवरही होत असल्याची चर्चा आहे. मात्र, विवाहाचा प्रश्न केवळ मुलींच्या संख्येपुरता मर्यादित नसून शिक्षण, रोजगार, आर्थिक परिस्थिती, सामाजिक अपेक्षा आणि बदलती जीवनशैली यांसारखे अनेक घटक त्यामागे असल्याचेही दिसून येते. किसनदेव ननावरे यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या विवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या मागण्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा.. देशाच्या प्रगतीचा पाळणा फक्त गुजरातमध्येच हलला का?:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा केवडियाला हलवल्यावरून राज ठाकरेंचा संताप; मोदी-शहांवर हल्लाबोल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमधील केवडिया अर्थात एकतानगर येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, “हा सोहळा गुजरातमध्येच का?” असा थेट सवाल केला आहे. सविस्तर वाचा..
Source link
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने 28 वर्षीय शेतकऱ्याचे आंदोलन:सरकारकडे 1 लाखांच्या अनुदानासह विवाह नोंदणी केंद्राची मागणी