![]()
सेलू तालुक्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवानजी धुर्वे यांचा मृत्यू होऊन तीन दिवस आणि दोन रात्री उलटल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. शासनाकडून ठोस मदत आणि समाधानकारक निर्णय मिळत नसल्याचा आरोप करत कुटुंबीय व ग्रामस्थांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भगवानजी धुर्वे यांचे पार्थिव तब्बल 60 तासांपासून सेलू ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून धुर्वे कुटुंबाला किमान 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. मागणी मान्य होत नसल्याने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू करण्यात आले असून, ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी खासदार अमर काळे स्वतः उपोषणाला बसले आहेत. शेतात काम करताना वाघाचा हल्ला भगवानजी धुर्वे हे शेतात काम करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रायपूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर धुर्वे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावात नेण्यात आले होते. मात्र, शासनाकडून अपेक्षित मदत आणि ठोस निर्णय मिळालेला नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी पार्थिव पुन्हा सेलू ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले. 60 तासांपासून पार्थिव शवागारात; प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी एका शेतकऱ्याचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी आंदोलन करण्याची वेळ येत आहे. त्यातही मृतदेह तब्बल 60 तास शवागारात ठेवावा लागत असल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी रात्री सेलू ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी धुर्वे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पोळ्यासाठी वेळ आहे, मग मृत शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी का नाही? या प्रकरणावरून खासदार अमर काळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रायपूरमध्ये एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्याचे पार्थिव तब्बल तीन दिवसांपासून शवागारात आहे. कुटुंबीय न्याय आणि मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील तीन मंत्री रामनगर येथे बैलपोळा उत्सवात सहभागी झाले असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर सवाल उपस्थित केला. शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आणि त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी वेळ नाही, मात्र उत्सवासाठी वेळ आहे, अशी टीका काळे यांनी केली. त्यामुळे या प्रकरणात सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. 25 लाखांची मदत अपुरी; 1 कोटींची मागणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारी 25 लाख रुपयांची मदत अपुरी असल्याचे खासदार अमर काळे यांनी म्हटले आहे. भगवानजी धुर्वे यांच्या कुटुंबाला किमान 1 कोटी रुपयांची मदत देण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकरी कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ तात्पुरती आर्थिक मदत पुरेशी ठरत नाही. कुटुंबाचा पुढील उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि भविष्यातील जबाबदाऱ्या यांचा विचार करून शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका काळे यांनी मांडली आहे. वाघ, अस्वल, रानडुक्करांच्या वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न विदर्भातील जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा धोका दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा मुद्दाही या घटनेनंतर पुन्हा पुढे आला आहे. वाघांसोबतच अस्वल, रानडुक्कर आणि रोही यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अनेकदा रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. मात्र, याच काळात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतर नुकसानभरपाई देण्यापेक्षा वन्यजीवांचा बंदोबस्त, जंगलालगत प्रभावी गस्त, धोकादायक भागांची ओळख आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा भगवानजी धुर्वे यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत देण्याबरोबरच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कुटुंबीयांशी चर्चा करावी आणि समाधानकारक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे भगवानजी धुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी होणार आणि शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला किती मदत जाहीर केली जाणार, याकडे रायपूरसह संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… यवतमाळमधील फुलसावंगी यात्रेत आकाश पाळण्यात थरार: महिलेचे केस बेरिंगमध्ये अडकले अन् डोक्याची चामडी निघाली, प्रकृती गंभीर सणासुदीच्या काळात यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्यंत भयंकर प्रसंग ओढवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने अवघ्या काही सेकंदात या महिलेचे केस जोराने खेचले गेले आणि केसांसह त्यांच्या डोक्याची चामडीच उपटून निघाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, प्रशासनाला जाग येईना!:60 तासांपासून पार्थिव शवागारात, खासदार अमर काळे उपोषणावर