![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील सध्याच्या ज्वलंत मुद्द्यांवरून फडणवीस-शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षणापासून ते सणांमधील डीजे बंदी, दिशा सालियन प्रकरण, आणि आगामी निवडणुकांतील पक्षाची रणनीती या सर्वच विषयांवर त्यांनी आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगेंची तब्येत खालावतेय, सरकारने ठोस निर्णय घ्यावा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणावर आणि त्यांच्या मुंबईला येण्याच्या इशाऱ्यावर बोलताना राऊत यांनी मोठी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या प्रकृतीचा विचार केला तर त्यांना हे उपोषण पेलवणार नाही. सातत्याने होत असलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चालली असून हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. सरकारने जरांगे यांच्या नादी न लागता मराठा आरक्षणाबाबत आपली ठोस भूमिका स्पष्ट करावी आणि हे उपोषण लवकरात लवकर कसे सुटेल, याची जबाबदारी राज्य सरकारनेच घ्यावी.” ओबीसी आरक्षणाला धक्का नकोच! ओबीसी नेत्यांच्या इशाऱ्यांवर आणि आरक्षणाच्या वादावर शिवसेनेची (ठाकरे गट) भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले, “ज्या समाजाला जे आरक्षण मिळाले आहे, त्याला कोणीही हात लावू नये, या मताचे आम्ही आहोत. ओबीसींच्या कोट्यातून कुणबी म्हणून आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला द्यावे, अशा मताचे आम्ही मुळीच नाही. त्याव्यतिरिक्त जे काही द्यायचे असेल, त्याबाबतचा ठोस निर्णय सरकारने घ्यावा.” डीजे बंदीवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य सणांमधील डीजेच्या वापरावरूनही त्यांनी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. “डीजेसारख्या घातक वाद्याचा वापर करून जो त्रास होतो, त्याऐवजी दुसरा मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता आहे. एकीकडे सरकार नागपूर आणि पनवेलसारख्या ठिकाणी डीजेवर बंदी घालते आणि दुसरीकडे आपले धोरण स्पष्ट करत नाही. गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे धोरण स्पष्ट केले पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी केली. दिशा सालियन प्रकरण आणि ‘ऑपरेशन टायगर’ दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव पुन्हा चर्चेत आणल्याबद्दल विचारले असता, त्यांनी एका वाक्यात जोरदार प्रहार केला. “हे म्हणजे मेलेले मढे पुन्हा एकदा उकरून काढण्याची पद्धत आहे,” असे ते म्हणाले. तसेच, नवरात्रीत राबवल्या जाणाऱ्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर (लोकप्रतिनिधी फोडण्याची मोहीम) टीका करताना ते म्हणाले, “ज्यांना खरेदी-विक्री करून आपला पक्ष चालवण्याची सवय लागली आहे, त्यांचा स्वतःच्या निर्मितीवर विश्वास राहिलेला नाही. पैशाचा वारेमाप वापर करून दुसऱ्यांचे लोकप्रतिनिधी विकत घेण्याच्या त्यांच्या धंद्याला जनता विटली असून, जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल.” पक्षप्रमुखांचे कोकणाकडे दुर्लक्ष? राऊतांचा मोठा खुलासा ठाकरे गटाचे वरिष्ठ नेतृत्व (उद्धव आणि आदित्य ठाकरे) कोकणात फारसे दौरे करत नाहीत, असा आक्षेप विरोधकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. यावर स्पष्टीकरण देताना विनायक राऊत म्हणाले, “पावसाळ्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशा वेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना दौरे करून वेठीस धरण्याऐवजी, वरिष्ठ नेतृत्व मुंबईतूनच त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. मागील आठवड्यातच रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण येथील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन चर्चा केली आहे. पावसाळा संपताच पक्षप्रमुख प्रत्येक जिल्ह्यानिहाय ग्रामीण भागाचे दौरे आणि मेळावे सुरू करणार आहेत.” हेही वाचा… लाडक्या बहिणींनो, आता अमृता फडणवीस-लता शिंदेंच्या घरी हळदी-कुंकवाला जा!: मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनासाठी मोठा प्लॅन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनातून **‘चलो मुंबई’**ची घोषणा करताना जरांगे यांनी आंदोलनाची दिशा, मुंबईपर्यंतचा मार्ग आणि आंदोलकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे, मुंबईतील आंदोलनादरम्यान मराठा समाजातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या घरी हळदी-कुंकू आंदोलन करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मराठा आरक्षणावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी:विनायक राऊतांचा फडणवीस सरकारला थेट सवाल; डीजे बंदीसह 'ऑपरेशन टायगरवरही केले भाष्य