![]()
सणासुदीच्या काळात यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्यंत भयंकर प्रसंग ओढवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने अवघ्या काही सेकंदात या महिलेचे केस जोराने खेचले गेले आणि केसांसह त्यांच्या डोक्याची चामडीच उपटून निघाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना कशी घडली? फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने मोठी यात्रा भरली होती. या यात्रेचा आनंद घेण्यासाठी बाली मारोती टाळीकोटे या महिला आल्या होत्या. त्या यात्रेतील आकाश पाळण्यात बसल्या. पाळणा वेगाने गोल फिरत असताना अचानक त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. वेगवान चक्रामुळे त्यांचे केस थेट मशीनमध्ये जोराने ओढले गेले. क्षणाचाही विलंब न होता, केसांसोबत त्यांच्या डोक्याची त्वचा (चामडी) अक्षरशः उपटून निघाली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांची तत्परता महिलेचा आक्रोश आणि हा भयानक प्रकार खाली उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आरडाओरड सुरू केली. नागरिकांच्या आणि संयोजकांच्या सतर्कतेमुळे आकाश पाळणा तत्काळ थांबवण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या बाली टाळीकोटे यांना मोठ्या मुश्किलीने पाळण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अत्यंत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे यात्रेतील उत्साहावर मोठे विरजण पडले असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. ——— हेही वाचा.. हॉटेलमध्ये जेवतानाच लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न: म्हणाले- हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, जरांगेंवर गंभीर आरोप राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र झालेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. हाके हे वडीगोद्रीहून सोलापूरमार्गे सांगोल्याकडे जात असताना पाकणी फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. यावेळी काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर हाके हॉटेलमधून बाहेर पडताना काही जणांनी त्यांची गाडी अडवल्याने पुन्हा वाद झाला आणि धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा
Source link
आकाश पाळण्यात केस अडकले अन् क्षणात डोक्याची चामडी निघाली:यवतमाळच्या तान्हा पोळा यात्रेत महिलेचा अपघात