![]()
हिंगोली जिल्हयात शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यासाठी प्राचार्यांना जबाबदार धरण्याचा इशारा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी दिला आहे. या संदर्भात गुट्ठे यांनी जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये महाविद्यालयांमध्ये सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमधील शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभागांमार्फत विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. अनेक वेळा महाविद्यालयाकडून अर्ज मुदतीत मंजूरीसाठी पाठविले जात नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी हे शिष्यवृत्तीचे ऑनलाइन संकेतस्थळ सध्या सुरू झाले असून, या पोर्टलवर मागील शैक्षणिक वर्षांतील अर्जांच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले आहेत. ज्या महाविद्यालयांमधील सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ मधील शिष्यवृत्तीचे मागासवर्गीय पात्र विद्यार्थी अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, अशा सर्व संबंधित महाविद्यालयांनी तातडीने त्रुटींची पूर्तता करून अर्ज मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे पाठवावेत. सद्यस्थितीत केवळ जुन्या अर्जांची त्रुटी पूर्तता करून, त्यांची छाननी करून ते ऑनलाइन अर्ज पुढे पाठवण्यासाठी १५ सप्टेंबर, २०२६ पर्यंत हे ऑनलाइन पोर्टल सुरू असणार आहे. त्यामुळे या निर्धारित मुदतीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले गेले आहेत. महाविद्यालयांनी तातडीने जुन्या प्रलंबित अर्जांची तपासणी करावी. अर्जांमधील त्रुटींची तात्काळ पूर्तता करून सर्व परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत निकाली काढावेत, जेणेकरून कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिला, तर त्यास थेट संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे.
Source link
मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य जबाबदार:हिंगोलीच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठेंचा इशारा