Headlines

हॉटेलमध्ये जेवतानाच लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न:म्हणाले- हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, जरांगेंवर गंभीर आरोप




राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र झालेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. हाके हे वडीगोद्रीहून सोलापूरमार्गे सांगोल्याकडे जात असताना पाकणी फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. यावेळी काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर हाके हॉटेलमधून बाहेर पडताना काही जणांनी त्यांची गाडी अडवल्याने पुन्हा वाद झाला आणि धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारावरून लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला असून, “ओबीसीचा आवाज दाबण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. माझ्यावर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. जीव गेला तरी ओबीसीचा आवाज थांबवणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. नेमकं काय घडलं? लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ते आपल्या सहकाऱ्यांसह मोहोळजवळील निसर्ग हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोबत जवळपास 10 ते 15 पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच एसपीओचे कर्मचारी होते. हाके यांच्या म्हणण्यानुसार, ते हॉटेलमध्ये पोहोचताच काही तरुण त्यांच्याजवळ आले. त्यातील एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली, तर इतरांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही मनोज जरांगे यांना विरोध का करता?”, “तुमच्या मागे किती लोक आहेत?”, “ओबीसी तुमच्या मागे आहे का?” अशा आशयाचे प्रश्न विचारत त्यांच्याशी वाद घालण्यात आल्याचा हाके यांचा दावा आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी संबंधित तरुणांना हॉटेलच्या बाहेर काढले. त्यानंतर हाके आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्येच जेवायला बसले. मात्र, बाहेरील परिस्थिती लक्षात घेता हॉटेलचे दार लावून त्यांनी जेवण केल्याचे हाके यांनी सांगितले. जेवणानंतर गाडी अडवली जेवण झाल्यानंतर हाके हॉटेलबाहेर आले आणि गाडीत बसण्याच्या तयारीत असताना पुन्हा काही तरुण तेथे आल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित तरुणांनी त्यांची गाडी अडवून रस्ता रोखल्याचे हाके यांनी सांगितले. यानंतर हाके आणि त्या तरुणांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. हाके यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. याच वेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन जणांना ताब्यात घेतले. तर काही जण घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. दारू प्यायले होते, स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न या घटनेवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी संबंधित तरुणांवर गंभीर आरोप केले. हल्ला करण्यासाठी आलेले तरुण दारूच्या नशेत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ते स्वतःला लातूर जिल्ह्यातील चाकूरचे रहिवासी आणि वकील असल्याचे सांगत असल्याचे हाके म्हणाले. “तुमच्याबरोबर आम्हाला हे करायचे आहे, आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या,” अशा प्रकारे संबंधित तरुण स्टंटबाजी करत असल्याचा आरोप हाके यांनी केला. त्यातील काही जण व्हिडीओ शूट करत होते, असेही त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या तरुणांकडूनच पुढील चौकशीत ते कोणाच्या संपर्कात होते, कोणाला फोन केला आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे स्पष्ट होईल, असे हाके यांनी म्हटले. हा माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न या घटनेला लक्ष्मण हाके यांनी केवळ वाद न मानता गंभीर हल्ल्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. “रात्रीचा हा हल्ला पकडला तर माझ्यावर झालेला हा अकरावा हल्ला आहे. ओबीसींचा आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर दादागिरी करून, मारहाण करून आरक्षण मिळवता येणार नाही. माझा जीव गेला तरी ओबीसीचा आवाज आम्ही थांबवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका हाके यांनी घेतली. विशेष म्हणजे, मोठा पोलीस बंदोबस्त सोबत असतानाही संबंधित तरुणांनी आपल्याशी हुज्जत घालण्याचे धाडस केले, यावरून ते कायद्याला घाबरत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “माझ्यासोबत 15च्या आसपास पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि चार पोलीस गाड्या असताना जर अशा प्रकारे हल्ला करण्याचे धाडस होत असेल, तर हा कायद्याला न मानणारा प्रकार आहे,” असे हाके म्हणाले. हाकेंचा जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. हल्लेखोर तरुण जरांगे यांचे नाव घेत असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकारामागे जरांगे समर्थक असल्याचा आरोप केला. “मनोज जरांगे यांचे नाव घेऊन हे लोक बोलत होते. ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. तुमची लायकी आता महाराष्ट्राला कळायला लागेल,” असा इशारा हाके यांनी दिला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. “फडणवीस साहेब, या भुताला लवकर आवरा. तुमच्या मानगुटीवर बसलेल्या या माणसाला आवरता येत नसेल तर आम्हाला सांगा,” अशा आक्रमक शब्दांत हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ओबीसी-मराठा संघर्षाला हिंसक वळण? राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीला जोर आला आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेते सातत्याने भूमिका मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर हाके यांच्यासोबत झालेल्या या वादामुळे आरक्षणाचा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या समर्थकांमध्ये सोशल मीडिया, सभांमध्ये तसेच प्रत्यक्ष आंदोलनांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. आता थेट एका नेत्याला लक्ष्य करून गोंधळ झाल्याचा आरोप झाल्याने पोलिसांसमोरही कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भुजबळ, वडेट्टीवार यांचाही हाके यांनी केला उल्लेख लक्ष्मण हाके यांनी या घटनेचा संदर्भ देताना ओबीसी नेत्यांना धमक्या आणि हल्ले होत असल्याचा आरोप केला. छगन भुजबळ यांच्या गाडीवर दगड घेऊन जाण्याच्या घटनेचा तसेच विजय वडेट्टीवार यांना धमकीचे फोन आल्याच्या दाव्याचा त्यांनी उल्लेख केला. “भुजबळ साहेबांवर पुण्यात रेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीने दगड घेऊन गाडीवर जाण्याचा प्रयत्न केला. वडेट्टीवार साहेबांनाही धमकीचे फोन आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा हाके यांनी केला. मात्र, या सर्व आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी होणे आणि संबंधित घटनांमागील नेमके कारण तपासातून समोर येणे महत्त्वाचे आहे. पोलिस तपासात नेमकं काय समोर येणार? घटनेनंतर मोहोळ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित तरुणांकडील मोबाईल, व्हिडीओ आणि घटनेपूर्वी तसेच घटनेनंतर झालेल्या संपर्कांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. हल्ल्याचा नेमका उद्देश काय होता, संबंधित तरुणांचा कोणाशी संपर्क होता, ते खरोखर कोणत्या संघटनेशी किंवा व्यक्तीशी संबंधित आहेत का आणि हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर गाडी अडवण्यामागे नेमका काय हेतू होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा आधीच अत्यंत संवेदनशील बनलेला असताना राजकीय किंवा सामाजिक मतभेद हिंसक घटनांमध्ये रूपांतरित होऊ नयेत, यासाठी प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ————— हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 15वा दिवस: आंतरवालीत आज राज्यव्यापी बैठक, मुंबईत धडकण्याची तयारी; मराठ्यांनी घरी बसू नये, अख्खा महाराष्ट्र ठप्प करू- जरांगे मराठा आरक्षण, 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी आंतरवाली सराटी येथे 14 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय १२ सप्टेंबर रोजी बैठकीत घेण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईत धडकण्यावर पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळाली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या भीतीपोटी लोकशाहीत नागरिकांचा आंदोलनाचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *