Headlines

मनोज जरांगेंच्या कोणत्या 12 मागण्या मान्य केल्या?:गिरीश महाजनांनी ती यादी आधी जनतेसमोर जाहीर करावी; विजय वडेट्टीवारांचे आव्हान




राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी नेत्यांवर होणारे हल्ले आणि त्यांना येणाऱ्या धमक्यांवरून वडेट्टीवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, जर सरकारने दबावाखाली येऊन ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला, तर राज्यात प्रचंड मोठे आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. ‘आम्हालाही धमक्या आल्या, पण आम्ही भीक घालत नाही’ ओबीसी नेत्यांवरील हल्ल्यांबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “एखाद्या ओबीसी नेत्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणे ही निंदनीय घटना आहे. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून आम्ही काही बोललो की आम्हालाही धमक्या आणि शिव्या येत आहेत. काही माफिया आणि अवैध धंदेवाल्यांना धमक्या देण्यासाठीच पोसले आहे का? असा प्रश्न पडतो. मात्र, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. सरकारने ओबीसी नेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अन्यथा राज्यात उद्रेक होईल.” ‘जरांगेंना सरकारनेच मोठं केलं’ मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी मुंबई आंदोलनावर बोलताना त्यांनी सर्व जबाबदारी सरकारवर ढकलली. “जरांगे पाटलांना सरकारनेच मोठं केलं आहे. आता ते सरकारच्या उरावर बसत असतील तर त्यांना उरावर ठेवायचं की डोक्यावर, हा सरकारचा प्रश्न आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही काही देण्यास आमचा विरोध नाही, पण त्यातून ओबीसींचे नुकसान आम्ही कदापि सहन करणार नाही,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, काही मराठा नेतेच आता जरांगे खाऊन-पिऊन आंदोलन करत असल्याचा आरोप करत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. १२ मागण्यांची यादी जाहीर करा मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या १२ मागण्या मान्य झाल्याचे म्हटले होते. याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले की, “गिरीश महाजनांनी कोणत्या १२ मागण्या मान्य केल्या आहेत, त्याची यादी जनतेसमोर आणि ओबीसी नेत्यांसमोर प्रसिद्ध करावी, जेणेकरून काय दिले आहे ते आम्हालाही कळेल.” ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास… भविष्यात सरकारने जरांगे यांच्या हिताचे आणि ओबीसींच्या विरोधात जाणारे निर्णय घेतल्यास काय करणार? या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “आमच्या वाट्यातील हक्काचे जर कोणी हिसकावून घेतले, तर आम्ही राज्यात प्रचंड मोठे आंदोलन आणि उपोषण उभे करू. गरज पडल्यास टोकाची भूमिका घेऊ,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच सण-उत्सवांमध्ये कोणीही विघ्न आणू नये, ही भूमिका योग्यच असल्याचेही त्यांनी मान्य केले. वडेट्टिवार एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. ——————- हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 15वा दिवस: आंतरवालीत आज राज्यव्यापी बैठक, मुंबईत धडकण्याची तयारी; मराठ्यांनी घरी बसू नये, अख्खा महाराष्ट्र ठप्प करू- जरांगे मराठा आरक्षण, 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी आंतरवाली सराटी येथे 14 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय १२ सप्टेंबर रोजी बैठकीत घेण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईत धडकण्यावर पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळाली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या भीतीपोटी लोकशाहीत नागरिकांचा आंदोलनाचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *