![]()
जळगावहून सोलापूरकडे जाणारा एक आयशर टेम्पो अजिंठा घाटात शुक्रवारी पहाटे चार वाजता उलटला होता. त्यामुळे तासभर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सोडवली. मात्र, त्यानंतर रात्री ७ वाजता पुन्हा घाट चढताना एका ट्रकमध्ये बिघाड झाला. त्यामुळे घाटात तासभर वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. याच वेळी ड्यूटी संपवून फर्दापूरकडे घरी परतत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी ज्योती परळे आणि अफसाना पठाण यांनी कर्तव्यनिष्ठा बजावत भरपावसात ठप्प झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या या कृतीचे वाहनधारकांनी कौतूक केले. अजिंठा घाटामध्ये शुक्रवारी सकाळच्या अपघाताची अडचण दूर झाल्यानंतर, रात्री सात वाजेच्या सुमारास घाटात पुन्हा एक अवजड वाहन बंद पडल्याने एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घाटात दोन्ही बाजूंनी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नेमक्या याच वेळी अजिंठा ठाण्यातील महिला पोलिस हवालदार ज्योती परळे आणि अफसाना पठाण या दिवसभराची ड्यूटी संपवून स्कूटीवरून फर्दापूरकडे आपल्या घराकडे जात होत्या. घाटात प्रचंड कोंडी आणि वाहनांच्या रांगा दिसताच त्यांनी कसलाही विचार न करता आपली स्कूटी बाजूला लावली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही दोन्ही महिला पोलिसांनी वर्दीचा आदर राखत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत वाहतूक कोंडी दूर केली. दरम्यान, अजिंठा घाटात अनेकदा अवजड वाहने तांत्रिक बिघाडामुळे बंद पडतात. परिणामी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. मात्र, शुक्रवारी रात्री सात वाजता पाऊस सुरू असतानाच वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा असल्याने दोेन्ही महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वताची दुचाकी बाजुला लावत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. १ किलोमीटर पायी फिरत अनेक वाहने पुढे सोडली ज्योती परळे यांनी घाटाच्या वरच्या बाजूने तर अफसाना पठाण यांनी घाटाच्या खालच्या बाजूने ताबा मिळवला. भरपावसात भिजत आणि एक किलोमीटर पायी फिरत त्यांनी दोन्ही बाजूंची वाहने एकेक करून पुढे सोडली. ड्यूटी संपलेली असतानाही जनहितासाठी या दोन्ही महिला पोलिसांनी दाखवलेले समर्पण पाहून वाहनधारकांनी चालत्या वाहनातून त्यांना सॅल्यूट ठोकला. कर्तव्यनिष्ठा दाखवणाऱ्या या महिलांचे कौतूक करण्यात येत आहे. जळगाव येथून मागवले क्रेन शुक्रवारी पहाटे ४ वाजता अपघाताच्या वेळेस कर्मचारी संजय कोळी, अण्णा गवळी आणि होमगार्ड दणके, राठोड व कांबळे यांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. जळगावहून क्रेन बोलावून अपघातग्रस्त आयशर टेम्पो बाजूला करीत वाहनांना रस्ता करून देण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली होती.
Source link
ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या महिला पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडली:अजिंठा घाटात शुक्रवारी रात्री 7 वाजता ट्रक बंद; भरपावसामध्ये दीड किलोमीटरची वाहतूक केली सुरळीत