![]()
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अहिल्यानगर शहरात एमआयडीसी परिसरातील एका कोल्ड स्टोरेजवर रात्री अचानक धाड टाकून तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपयांचे बटर जप्त केले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. नागापूर औद्योगिक वसाहतीतील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर १० सप्टेंबर रोजी रात्री एफडीएच्या पथकाने हा छापा टाकला. या ठिकाणी कमी दर्जाचे आणि लेबलच्या नियमांचे उल्लंघन करून तयार केलेले तब्बल ७५ हजार ३५६ किलो लोणी साठवून ठेवण्यात आले होते. हा अवाढव्य साठा पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीचा असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत हा सर्व साठा सील केला आहे. जप्त बटरचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून अहवालानंतर दोषींवर अन्न फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यात चार ट्रकमधील ३९ लाखांचा खवा व पनीर जप्त एफडीएने पुण्यात ३९ लाख रुपये किमतीचा ४६०० किलो खवा आणि १२ हजार ५०० किलो पनीर जप्त करण्यात आले आहे. बुधवार पेठ परिसरातून पनीर आणि खव्याने भरलेले चार ट्रकही ताब्यात घेतली आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनुसार, जप्त केलेला ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा खवा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून आणला होता. हा खवा २० किलोच्या गोण्यांमध्ये अस्वच्छ स्थितीत ठेवला होता. याशिवाय, कर्नाटकातील बेळगाव आणि बागलकोट भागातून आलेले मलाई पनीर, लो-फॅट पनीर व मिडीयम-फॅट पनीर पकडले. या १२,५०० किलो पनीरची अंदाजे किंमत २७ लाख ८३ हजार रुपये आहे. शहरातील २५ ते ३० व्यापाऱ्यांनी पनीरची तर ३० ते ३५ व्यापाऱ्यांनी खव्याची ऑर्डर दिली होती. १० दिवस पाळत ठेवून कारवाई ही कारवाई अचानक केली नसून एफडीएने यासाठी १० ते १२ दिवस गुप्तपणे माहिती गोळा केली. हा माल कुठून येतो, कधी शहरात प्रवेश करतो आणि त्याचे खरेदी-वितरण कोण करते, यावर पाळत ठेवली होती. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच गुन्हे दाखल केले जातील. बटरमुळे हृदयविकाराचा, रक्तवाहिन्या ब्लॉकचा धोका कुकिंग बटरमध्ये पामतेल, प्राण्यांची चरबी, स्टार्च, सिंथेटिक रंग असतात. भेसळयुक्त बटरमध्ये ट्रान्स फॅट्स आणि हायड्रोजनेटेड ऑइलचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
Source link
भेसळीच्या संशयावरून अहिल्यानगरला एफडीएकडून 4 कोटींचे बटर जप्त:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कारवाई, 75 हजार किलोचा साठा सील; पुण्यातही खवा अन् पनीर जप्त