Headlines

200 रुपयांसाठी मित्राकडून डोक्यात काठी घालून खून:कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील तरोडा गावातील घटना‎




ऐन करिच्या दिवशी चांदूर रेल्वे तालुक्यातील तरोडा गावात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच ५५ वर्षीय मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. मृतकाकडे मारेकऱ्याने २०० रुपये मागितले होते. ते तत्काळ न दिल्यामुळे ५५ वर्षीय मित्राच्या डोक्यात काठीने वार करून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासांत मारेकऱ्याला पकडले आहे. दादाराव तुकाराम बोरकर (५५, रा. तरोडा) असे मृतकाचे नाव असून, अरुण भीमरावजी ठाकरे (५५, रा. तरोडा) असे पकडलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, दादाराव बोरकर आणि अरुण ठाकरे हे दोघेही मित्र होते. ते एकत्र दारू पिऊन आपापल्या घरी परत जात होते. दरम्यान, वाटेत अरुण ठाकरेने बोरकर यांच्याकडे २०० रुपये मागितले. बोरकर यांनी ती रक्कम देतो, मात्र काही वेळ थांब, असे म्हटले. तेवढ्याच कारणावरून ठाकरेने बोरकर यांच्यासोबत वाद घातला. संतापलेल्या अरुण ठाकरेने बाजूलाच पडलेली काठी दादाराव बोरकर यांच्या डोक्यात जोरदार मारली. या भीषण वारामुळे दादाराव जागीच कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणामुळे तरोडा गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ गिरीष ताथोड, कुऱ्हाचे ठाणेदार शिवहरी सरोदे, पीएसआय आशिष झिमटे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्याला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *