मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “जरांगे पाटील मुंबईला जातात कधीही आंदोलन करायला, तो त्यांचा विषय आहे. मात्र न्यायालयाचा आदेश सर्वांनी पाळावा, अशी अपे
.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले असून मुंबईच्या दिशेने जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना मुंबईत येण्यास थेट प्रतिबंध केलेला नसला, तरी आंदोलन शांततेत आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून व्हावे, अशी भूमिका न्यायालयाने मांडली आहे.
कोर्टाचा आदेश सगळ्यांनी पाळावा
जरांगे पाटील मुंबईकडे जाणार असल्याबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर किंवा आदेशावर अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगितले. “कोर्टामध्ये बोलणं मला उचित होणार नाही. कोर्ट हे सगळ्यात प्रमुख असते. कोर्टाचे नियम सगळे पाळतील, अशी अपेक्षा आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले. जरांगे पाटील मुंबईत जाऊन आंदोलन करतात की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे सर्वांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारकडून जरांगे यांच्या आंदोलनाला थेट विरोध करण्याऐवजी कायदेशीर चौकटीत परिस्थिती हाताळण्याची भूमिका असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कसोटी
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देणे आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाशी संबंधित विविध मागण्यांचा समावेश आहे. जरांगे यांनी सरकारवर ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप करत आंदोलनाची पुढील दिशा मुंबईकडे वळवण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी केलेली मागणी फेटाळली. शांततामय आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. यामुळे आता जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा आणि सरकारकडून त्यावर केली जाणारी कारवाई याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या इंग्रजीमुळे महाराष्ट्राची ‘कॉलर टाईट’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. “मला स्वतःला माहीत नव्हते की एकनाथ शिंदे साहेब एवढे चांगले इंग्रजी बोलतात. आमचा माणूस किती शांत आणि संयमी आहे आणि ते कसे इंग्रजी बोलतात, हे आम्हाला बघायला मिळाले. महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री आहेत ज्यांना लंडनमध्ये एवढा चांगला सन्मान मिळाला. मराठी माणसाचा जो सन्मान झाला त्यामुळे महाराष्ट्राची कॉलर टाईट झाली आहे,” असा आनंद त्यांनी व्यक्त केला.
ड्रग्जचा विळखा आणि पोलिसांना सतर्कतेचे आवाहन
राज्यात वाढणाऱ्या नशेच्या विळख्यावर त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली. “ड्रग्सचे लोण आता पंजाबप्रमाणे आपल्याकडेही वाढत आहे. 12 वर्षांच्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत ड्रग्स, गांजा आणि दारूचा प्रभाव वाढत आहे. हे एक मोठे आव्हान आहे. गुन्हे घडल्यावर सर्वात आधी पोहोचणारा माणूस ‘पोलीस पाटील’ असतो, त्यामुळे त्यांनी या नशेच्या विरोधात अधिक सतर्क राहून प्रशासनाला मदत करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
बनावट खवा विकणे देशद्रोहापेक्षाही भयंकर
पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जप्त करण्यात आलेल्या चार ट्रक बनावट खव्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “अन्न व औषध प्रशासन (FDA) कारवाई करत असले तरी हे लोक थांबायला तयार नाहीत. लोकांच्या जीवाशी खेळणारे हे काम देशद्रोहापेक्षाही वाईट आहे. अशा गुन्हेगारांना तात्काळ आणि अत्यंत कठोर शिक्षाच दिली गेली पाहिजे.”
दुष्काळाची पाहणी सप्टेंबर अखेरीसच करा
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर तांत्रिक मुद्दा मांडताना मंत्री म्हणाले, “पीक कापणीचा प्रयोग साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होतो. पण तोपर्यंत पिके शिल्लक राहणार नाहीत, शेतकरी ती काढून टाकतील. त्यामुळे पिकांची पाहणी आणि पीक कापणीचा प्रयोग ऑक्टोबरऐवजी ‘सप्टेंबर एंडिंगला’च करण्यात यावा, अशी आमची शासनाकडे मागणी राहणार आहे.”
महायुतीतील अंतर्गत नाराजी
नंदुरबारमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निधीवाटपावरून व्यक्त केलेल्या नाराजीवर ते म्हणाले, “भाजप, शिवसेना आणि पालकमंत्री यांच्यातील निधीवाटपाचे हे प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात थोडेफार असतात. आमचे तीन पक्षांचे सरकार आहे, काही अंतर्गत भानगडी असल्या तरी आम्ही आमच्या पद्धतीने हे प्रश्न नक्की सोडवू.”
———–
हेही वाचा…
माझा भाऊ जे करेल ते शांततापूर्वकच करेल!: जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या- आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील!

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचे ते शांततापूर्वकच करेल, असा मला विश्वास आहे,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी