Headlines

अमित अढाऊ यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विदर्भ संपर्क प्रमुखपदी निवड:शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या युवा नेत्याला रविकांत तुपकर यांनी दिली जबाबदारी.




शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे युवा नेतृत्व अमित अढाऊ यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विदर्भ संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे. संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी नुकतेच अमरावती येथील आंदोलनादरम्यान त्यांच्या निवडीची घोषणा केली. तुपकर यांनी अढाऊ यांना नियुक्तीपत्रही दिले. शेतकरी चळवळीत सक्रिय असलेल्या अढाऊ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. शेतमालाचे दर, हमीभाव, आयात-निर्यात धोरण, पीकविमा आणि कृषी अर्थकारण यांसारख्या विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. प्रशासनासमोर ते कागदपत्रे, आकडेवारी आणि ठोस पुराव्यांसह प्रश्न मांडतात. केवळ घोषणाबाजी न करता, मुद्द्यांच्या आधारे प्रशासनाला घेरणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अमित अढाऊ यांनी ‘प्रहार’ संघटनेपासून आपला सामाजिक-राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेत’ काम करत शेतकरी प्रश्नांवरील विविध आंदोलनांचा अनुभव घेतला. आता ते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. तुपकरांच्या आक्रमक आंदोलनशैलीला अढाऊ यांच्या अभ्यासपूर्ण रणनीतीची आणि संघटनात्मक कौशल्याची जोड मिळाल्याने विदर्भातील शेतकरी प्रश्नांवरील लढ्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. संघटनेने भविष्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्याची तयारी केली आहे. शेतमालाला योग्य भाव, पीकविमा, कर्जबाजारीपणा, नुकसानभरपाई, वीज उपलब्धता, सिंचनासाठी पाणी आणि शासनाच्या कृषी धोरणांविरोधातील प्रश्न हे यात समाविष्ट आहेत. या प्रश्नांवर विदर्भात अधिक आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू असल्याचे अढाऊ यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *