Headlines

दीड महिन्याच्या खंडानंतर अमरावतीत किरकोळ पाऊस सुरू:कापूस, तुरीला नवसंजीवनीची शक्यता; सोयाबीन हातचे गेले, सरासरी 336.4 मिमीने कमी




अमरावतीसह जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये तब्बल दीड महिन्यापासून पावसाने खंड दिला होता. यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता दोन दिवसांपासून किरकोळ पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कापूस, तूर आणि इतर पिकांना नवसंजीवनी मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, खूप दिवसांच्या खंडामुळे महत्त्वाचे पीक असलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. यावर्षी पावसाची सरासरीदेखील ३३६.४ मिलीमीटरने कमी नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीनुसार, १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ७६९.९ मिलीमीटर पाऊस पडायचा. यावर्षी तो केवळ ४३३.५ मिलीमीटरवर थांबला आहे. जून महिन्याचा प्रारंभ आणि अखेर तसेच जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर अमरावती जिल्ह्याला अल निनोचा परिणाम जाणवला. यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना हाती आलेले सोयाबीन गमावण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याचे एकूण पेरणी क्षेत्र ७ लाख हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख ४० हजार हेक्टरमध्ये यावर्षी सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र, फुले येऊन शेंगा भरण्याच्या वेळेपर्यंतही पाऊस न पडल्याने बहुतेक शेतकऱ्यांचे सोयाबीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उशिरा पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांनाच आताच्या किरकोळ पावसाचा फायदा होईल. एकूण क्षेत्रापैकी जिल्ह्यात २ लाख ५५ हजार हेक्टरमध्ये कापूस आणि १ लाख २१ हजार हेक्टरमध्ये तुरीचे पीक घेतले जाते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या किरकोळ पावसामुळे या दोन पिकांना मात्र नवसंजीवनी मिळेल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चालू पावसाळ्यात अमरावती जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा तब्बल ३३६.४ मिलीमीटर पाऊस कमी नोंदवला गेला आहे. या मोठ्या कमतरतेमुळे भविष्यात पाण्याची टंचाई आणि सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्यासाठी आणि दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी अजूनही जोरदार पावसाची खूप गरज आहे. सध्या सुरू असलेला किरकोळ पाऊस आणखी पाच दिवस राहील. रविवारपासून पावसाचा जोर वाढेल, पण १७ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा खंड पडेल. त्यामुळे या आठवड्यात पडणारा पाऊस हाच कदाचित शेवटचा पाऊस ठरू शकतो, असे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले. जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. ज्या ठिकाणी सोयाबीनला शेंगा असून त्या भरत आहेत, त्या सोयाबीनला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. मात्र, कापूस आणि तुरीसाठी हा पाऊस खूप महत्त्वाचा ठरला आहे, असे एसएओ, अमरावतीचे राहुल सातपुते यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *