Headlines

महाबळेश्वरातून पाकिस्तानी संपर्काचा संशयित ताब्यात:‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधाचा संशय, दोन मोबाइलसह डायरी जप्त




मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला आलेल्या धमकीच्या प्रकरणाचा तपास आता थेट पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील संपर्कांपर्यंत पोहोचला आहे. या तपासात महाबळेश्वर तालुक्यातील मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय 39) याचे पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्क असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने त्याला पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, व्यावसायिक इम्तियाज खत्री यांनी वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाच्या कारवाईला पाठिंबा दर्शविल्यानंतर त्यांना 21 मेपासून आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमकीचे फोन आणि संदेश येत होते. याप्रकरणी 22 जून रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. त्यातून लोन याचे नाव तपासाच्या रडारवर आले. पाकव्याप्त काश्मीरपर्यंत धागेदोरे तपासात लोनच्या कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचा एक भाऊ 2019 मध्ये पाकिस्तानात गेल्याचे आणि त्याचे प्रतिबंधित ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असण्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे लोनच्या पाकिस्तानातील संपर्कांचे स्वरूप, त्यांची कारणे आणि धमकी प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, याचा तपास वेगाने सुरू आहे. ‘फैयाज काश्मिरी’च्या संपर्कात? लोनचा ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी समाजमाध्यमांवर संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहितीही तपास यंत्रणेस मिळाली आहे. त्यामुळे केवळ धमकीचे फोन कोणी केले, यापुरता तपास मर्यादित न राहता या संपर्कांच्या माध्यमातून आणखी कोणती साखळी कार्यरत होती का, याचा शोध घेतला जात आहे. दोन मोबाइल, डायरी जप्त मुंबई गुन्हे शाखेने लोनकडून दोन मोबाइल फोन आणि एक डायरी जप्त केली आहे. मोबाइलमधून हटविण्यात आलेला मजकूर, संदेश, संपर्क क्रमांक आणि अन्य डिजिटल माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या डिजिटल तपासातून धमकी प्रकरणातील संपर्कांचे धागेदोरे, आर्थिक व्यवहार आणि अन्य संशयित व्यक्तींची माहिती मिळण्याची शक्यता आहे. ‘धमकी’च्या मागे नेमके कोण? लोनचा थेट धमकी प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप तपासातून स्पष्ट व्हायचे आहे. मात्र पाकिस्तानमधील संपर्क, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील कौटुंबिक संबंध, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीशी जोडलेले धागे यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे. पोलिसांचा दावा “महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक करण्यात आली आहे. त्याचे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याची माहिती तपासातून समोर आली असून, पुढील चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.— सुनील साळुंखे, पोलिस उपअधीक्षक, वाई उपविभाग , सातारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *