Headlines

‘सेवा संकल्प अभियान नसून मेवा संकल्प अभियान’:अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सुरू करण्यात येणारे ‘सेवा संकल्प अभियान’ हे प्रत्यक्षात ‘मेवा संकल्प अभियान’ असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. देशाची राजधानी दिल्ली असली, तरी आर्थिक राजधानी मुंबई आहे. या आर्थिक राजधानीत येऊन भाजपला जास्तीत जास्त ‘मेवा’ कसा मिळवता येईल, याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर केला. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा हा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी असता, तर त्यांनी सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी. तसे न करता जमीन उद्योगपतींना देण्यापासून ते विविध कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा हिशोब घेण्यासाठी हा दौरा असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. कुंभमेळ्यातील कथित 35 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा हिशोबही घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील दुष्काळ, शेतकरी प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलन, एमपीएससी पेपरफुटी, गणपती विसर्जनाचा वाद, वन्यप्राण्यांचे हल्ले, दिशा सालियन प्रकरण तसेच भाजप-शिवसेनेतील अंतर्गत संघर्षावर त्यांनी भूमिका मांडली. दुष्काळात शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, लांबलेल्या पेरण्या आणि त्यानंतर पावसाने दिलेली दडी यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे, असे सपकाळ म्हणाले. पिके करपण्याची आणि वाळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता पाऊस झाला तरी खरीप पिकांना त्याचा फारसा उपयोग होणार नाही, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.सरकारने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी. त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफीचा सुधारित शासन निर्णय काढावा. कर्जाच्या पुनर्गठनाची वेळ न आणता संपूर्ण कर्जमाफी करावी. आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशके सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘सेवा संकल्प नव्हे, मेवा संकल्प’; अमित शाह यांच्या दौऱ्यावर निशाणा ‘सेवा संकल्प अभियान’च्या नावाखाली भाजपकडून मोठा कार्यक्रम केला जात असला, तरी प्रत्यक्षात हे ‘मेवा संकल्प अभियान’ असल्याचे सपकाळ म्हणाले. महाराष्ट्रात येऊन भाजपला अधिकाधिक आर्थिक फायदा कसा मिळेल, याचाच विचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील किती जमीन उद्योगपतींना देण्यात आली, त्यातून किती पैसे आले, आणखी कोणत्या जमिनी विकल्या जाणार आहेत, किती भ्रष्टाचार झाला, याचा आढावा घेण्यासाठी अमित शाह आले आहेत, असा आरोप त्यांनी केला. कुंभमेळ्यातील कथित ३५ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या पैशांचे वाटप कसे करायचे, याचाही हिशोब या दौऱ्यात घेतला जात असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता अमित शाह यांनी खरोखरच सेवा करायची असेल, तर त्यांनी मेवा लाटण्याच्या भानगडीत न पडता सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई जाहीर करावी. अन्यथा त्यांचा हा दौरा केवळ राजकीय आणि दिखाव्याचा कार्यक्रम ठरेल, असे सपकाळ म्हणाले. ‘जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारकडून त्रास’ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरही सपकाळ यांनी सरकारला लक्ष्य केले. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विविध आंदोलकांना सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.आंदोलनस्थळी वीजपुरवठा खंडित होणे, पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण करणे, मूलभूत सुविधांमध्ये अडथळे आणणे, अशा प्रकारची शृंखला महाराष्ट्रभर सुरू असल्याचे ते म्हणाले. याचाच फटका मराठा आंदोलकांनाही बसत असल्याचा दावा त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या भाषेवर टीका करण्यापेक्षा सरकारने मराठा समाजाला यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा जाहीर खुलासा करावा. जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. मात्र विविध जातींना आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारमध्ये उरलेली नसल्याने मराठा आंदोलन चिघळत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. ‘शिवसेना-भाजपमधील संघर्ष म्हणजे नुरा कुस्ती’ चिखलीच्या आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षावरही सपकाळ यांनी भाष्य केले. शिवसेना आणि भाजपमधील तथाकथित संघर्ष ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका त्यांनी केली. ‘मी तुला मारायचे सोंग करतो, तू रडायचे सोंग कर’ अशा पद्धतीने हा संघर्ष सुरू असल्याचे ते म्हणाले. खरोखरच दोन्ही पक्षांमध्ये भांडण असेल, तर सत्तेतून बाहेर पडण्याचा संघर्ष स्पष्ट झाला पाहिजे होता. मात्र भ्रष्टाचार कोणी किती करायचा आणि कोण किती दमदाटी करायची, या हेकेखोरीची झालर या वादाला असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दोन्ही आमदारांकडून एकमेकांवर दहशत, खोटे गुन्हे आणि गुन्हे दाखल करण्याचे आरोप होत आहेत. राजकीय मतभेद असले तरी भाषा आणि शैली सभ्य असली पाहिजे. संस्कृती जोपासली पाहिजे. मात्र विकृती पुढे आली, तर ती जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक आहे. ‘अति तिथे माती’ या म्हणीचा साक्षात्कार बुलढाणावासीयांना लवकरच होईल, असा इशाराही त्यांनी दिला. ‘एमपीएससी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा’ एमपीएससीच्या सचिवांच्या चेहऱ्यावर काळे फासण्याच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावरही सपकाळ यांनी भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. सर्व कागदपत्रे सार्वजनिक केली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. एमपीएससीचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्यमंत्री यांच्यावर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाने त्यांच्या तोंडाला काळे लागले आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली. एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीचे मोठे रॅकेट महाराष्ट्रात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संपूर्ण पर्दाफाश झाला पाहिजे. प्रकरण दडपण्यासाठी सरकारकडून आपल्या मर्जीतील व्यक्तींना पदांवर बसवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा झाला पाहिजे. दोषींची जबाबदारी निश्चित करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ‘वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर व्यापक धोरणाची गरज’ राज्यात मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढत असून, गडचिरोली आणि चंद्रपूरनंतर आता वर्धा आणि अमरावतीपर्यंत त्याचे लोण पोहोचले आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे सपकाळ म्हणाले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतरही मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागत असल्याची परिस्थिती गंभीर आहे. आदिवासी आणि प्रभावित कुटुंबांना सरकारने योग्य मदत द्यावी. सरकारच्या विद्यमान निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. गणपती उत्सवात सरकारने अनावश्यक हस्तक्षेप करू नये पुण्यातील गणपती विसर्जनाच्या वादावर बोलताना सपकाळ यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. महाराष्ट्राला ‘तालिबान’ बनवण्याचा प्रयत्न सुरू असून, तालिबानी प्रवृत्तीच्या अनुषंगाने मुद्द्यांवर आणि कायद्याच्या चौकटीत चर्चा करण्याऐवजी सवंग चर्चा घडवून आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊ द्यायचे नाही, अशी सरकारची भूमिका असल्याची टीका त्यांनी केली. सण प्रदूषणासाठी नसतो, तर आनंद साजरा करण्यासाठी असतो. त्या आनंदात विनाकारण विघ्न आणू नये, असे ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करू नका दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांना अटक करावी, अशी मागणी होत असल्याबाबत सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. जर या प्रकरणात काही तथ्य असेल, तर सरकारने आतापर्यंत कारवाई करायला हवी होती. कोणीतरी काही म्हणाले आणि दुसऱ्याने काही आरोप केले म्हणून प्रत्येक प्रकरणाचे राजकारण करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्याचा काँग्रेस निषेध करते, असे सपकाळ यांनी सांगितले. संजय गायकवाडांच्या शुभेच्छांचा स्वीकार राजकीय विरोधक मानले जाणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबाबत विचारले असता सपकाळ यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ओवीचा संदर्भ दिला. ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परें पडो, मैत्र जीवाचें’ हा जीवन जगण्याचा सिद्धांत असल्याचे त्यांनी सांगितले. खलत्व नष्ट व्हावे आणि सर्वांनी एकमेकांचे मित्र राहावे, या भूमिकेतून शुभेच्छांचा स्वीकार करतो, असे ते म्हणाले.भ्रष्टाचार, दमदाटी, हेकेखोरी आणि अपशब्दांच्या माध्यमातून जे खलत्व निर्माण झाले आहे, ते दूर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘ही सुबुद्धी दे दयाघना, दुर्बुद्धी दूर कर’ अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘संघाची भूमिका डुप्लिकेट’; मोहन भागवतांच्या विधानांवर टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्यांवरही सपकाळ यांनी टीका केली. संघ ‘लिबरल’ होत असल्याचे म्हणणे चुकीचे असून, संघाची भूमिका ‘डुप्लिकेट’ असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘बंच ऑफ थॉट्स’मधील विचार हे संघाचे तत्त्वज्ञान असून ते तत्त्वज्ञान लपवून ठेवले जाते. भारताचे संविधान संघाला अमान्य आहे, मात्र संविधान स्वीकारल्याचे दाखवले जाते. तिरंग्याबाबतही अशीच भूमिका असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. संघ आणि भाजपची मुस्लिम द्वेषाची भूमिका असल्याचा आरोप करताना नरेंद्र मोदी यांनी दहापेक्षा अधिक इस्लामिक देशांचे सर्वोच्च पुरस्कार स्वीकारले आहेत. एका धर्माबाबत विरोधाची भूमिका असेल, तर या देशांचे सर्वोच्च पुरस्कार स्वीकारण्याचे स्पष्टीकरण भाजप आणि संघाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. ‘गाला डिनरमधील अनुपस्थिती दुर्दैवी’ ब्रिक्सच्या बैठकीतील गाला डिनरमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि अबुधाबीचे क्राउन प्रिन्स अनुपस्थित राहिल्याबाबतही सपकाळ यांनी भाष्य केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आणि परराष्ट्र धोरणाबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.ब्रिक्सच्या माध्यमातून भारतासह सदस्य देशांना आपापल्या चलनात व्यापार करता यावा आणि आशियाई देशांचे एक मजबूत आर्थिक युनिट उभे राहावे, अशी अपेक्षा होती. मात्र या संघटनेचा अपेक्षित फायदा भारताला मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्सचा मूळ उद्देश सफल व्हावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ‘विश्वगुरू’ म्हणून स्वतःचे नाटकीय सादरीकरण केल्यामुळे भारतासमोर अनेक समस्या निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारकडून केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. प्रत्यक्षात शेतकरी दुष्काळामुळे संकटात आहे, विद्यार्थी पेपरफुटीच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत, मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. या सर्व प्रश्नांवर सरकारने राजकारण न करता ठोस निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत, संपूर्ण कर्जमाफी, विद्यार्थ्यांच्या पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि आंदोलकांच्या मूलभूत सुविधांची हमी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हेही वाचा… प्रवाशांच्या सेवेसाठी STचा ताफा अधिक सक्षम होणार:पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. सविस्त वाचा ..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *