Headlines

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत 22 वर्षांनी सहा शिक्षकांना नियुक्ती:अभ्यासगटाच्या शिफारसींमुळे मार्गी लागला रखडलेला प्रश्न, नगराध्यक्ष गायगोलेंनी दिले नियुक्तीपत्रे




अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेने शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या २२ वर्षांपासून रखडलेला शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लावत नगरपरिषदेने एकाच दिवशी सहा शिक्षकांना नियुक्तीपत्रे दिली. यापूर्वी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. नगराध्यक्ष अविनाश गायगोले आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर शाळांचे नूतनीकरण, सोयी-सुविधा आणि शिक्षकांच्या तुटवड्यावर लक्ष दिले. मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि एका अभ्यासगटाच्या शिफारसींमुळे हा प्रश्न सुटला. पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ६ शिक्षकांना नियुक्ती मिळाली. नगरपरिषदेच्या सभागृहात उत्साहात नियुक्ती सोहळा पार पडला. नवनियुक्त शिक्षक त्यांच्या कुटुंबीयांसोबत उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष गायगोले यांनी शिक्षकांना सांगितले की, “तुम्ही आजपासून सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाशी जोडले गेला आहात. गोरगरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि तुमच्या हातून गुणवंत विद्यार्थी घडावेत, या उद्देशाने ही नियुक्ती केली आहे.” त्यांनी शिक्षकांनी हे आव्हान स्वीकारून शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला उपनगराध्यक्ष प्रियंका मालठाणे, शिक्षण सभापती मो. मुनाफ मो. रेहान, बांधकाम सभापती शेख नईम, नगरसेवक आसीफ ताज मोहमद, मो. कलीम मो. कलाम, शोयब खान, प्रदीप देशमुख, राजु कुरेशी, अकबर शहा, मुज्जमील अली, रहीम शहा, अजय पसारी, सुधीर देवगीरे, गजानन विजेकर, श्रीकांत जुनघरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भरती प्रक्रियेसाठी आमदार ज.मो. आभ्यंकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. रवींद्र कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष अभ्यासगट नेमण्यात आला होता. या गटाने सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळवल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही या शिक्षकांना केवळ नोकरी दिली नाही, तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी सोपवली आहे. खाजगी शाळा परवडत नसल्याने नगरपरिषदेच्या शाळा हेच आमचे सर्वस्व आहे. त्यामुळे आता नव्या शिक्षकांची खरी परीक्षा सुरू झाली आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *