Headlines

डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा: पोलिस आयुक्तांचे मंडळांना आवाहन:नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार; ढोल-लेझिमला प्रोत्साहन देण्याचे आवाहन




पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करून डीजे आणण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पारंपरिक ढोल, लेझिम आणि इतर वाद्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार विलास भुमरे, महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, किरण डोंगरगावकर, बाळासाहेब थोरात, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, गेल्या वर्षी शहरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सव डीजेमुक्त पद्धतीने साजरे झाले. गणेश विसर्जनाची मिरवणूकही रात्री साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत पूर्ण झाली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. इंदूरचे बँड आणल्याने मिरवणूक अतिशय आकर्षक झाली होती. त्यांनी सांगितले की, शहरातील तरुणांनी ढोल, लेझिम, पारंपरिक नृत्य आणि वाद्यांचा एक-दोन महिने सराव केला आहे. या कलावंतांना चांगले व्यासपीठ मिळाले पाहिजे आणि त्यांची कला नागरिकांना पाहता यावी. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. डीजेमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना आता इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्येही पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण गेल्या वर्षीपासून ती प्रत्यक्षात आणली आहे, असेही पवार यांनी नमूद केले. डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना पवार यांनी नियमांची पळवाट शोधू नये, असा इशारा दिला. “दोन बेस, दोन टॉपच्या नावाखाली डीजे आणण्याचा प्रयत्न करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील. डीजे ऑपरेटरची यादी पोलिसांकडे आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी प्रशासनाच्या शांतता समितीच्या बैठकीतील संदेश प्रत्येक गणेश मंडळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, कालपर्यंत शहरातील सुमारे ३७९ गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे. ज्या मंडळांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही, त्यांनी नियमानुसार परवानगी घ्यावी. महापालिकेतर्फे यंदा ‘स्वच्छतेचा राजा’ ही स्पर्धा घेण्यात येणार असून, आतापर्यंत १५० मंडळांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी २५० मंडळांनी सहभाग घेतला होता, यंदा ३०० मंडळांचा सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *