![]()
पुण्यात फसवणुकीचे दोन मोठे प्रकार समोर आले आहेत. यात एका डॉक्टरची १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेची आणि तिच्या सहकाऱ्यांची ३५ लाख २४ हजार २५० रुपयांची फसवणूक झाली आहे. एकूण २ कोटी ३२ लाख ८४ हजार २५० रुपयांची फसवणूक झाली आहे. पहिल्या प्रकरणात, एका ट्रस्टला मोठी देणगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका डॉक्टरची १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. देणगी मिळवण्यासाठी आधी पैसे द्यावे लागतील, असे आरोपींनी सांगितले होते. याप्रकरणी ऋषिकेश गोसावी, गणेश अरुण ठाणगे, अभिषेक सूर्यवंशी, मोहम्मद, नितू सिंग, टेरेन्स विज, शेख आणि एका अज्ञात व्यक्तीवर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश दिलीप मुनोत (वय ३८, रा. शनिवार पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत ही फसवणूक झाली. आरोपींनी संगनमत करून मुनोत यांचा विश्वास जिंकला. त्यांच्या ट्रस्टला मोठ्या रकमेची देणगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. देणगीचा निधी मिळण्यापूर्वी विविध कारणांसाठी आधी रक्कम भरावी लागेल, असे आरोपींनी सांगितले.त्यानुसार, ईस्ट स्ट्रीटवरील मुनोत यांच्या दवाखान्यात आणि मार्केट यार्डमधील श्रीकृष्ण एंटरप्रायजेसच्या कार्यालयात पैशांचे व्यवहार झाले. आरोपींनी मुनोत यांच्याकडून १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये घेतले, पण ट्रस्टला देणगी मिळवून दिली नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत. मार्केट यार्ड पोलिस या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. गुंतवणुकीवर जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक दुसऱ्या एका घटनेत, गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिला आणि तिच्या सहकाऱ्यांची ३५ लाख २४ हजार २५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे परत मागितल्यावर त्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी स्टेला संतोष तायडे, संतोष अंकुश तायडे, जॉय संतोष तायडे आणि एंजेल संतोष तायडे (सर्व रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली) यांच्यावर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा ज्ञानेश्वर शिर्के (वय ४५, रा. जयप्रकाशनगर, लोहगाव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून२०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत राजीव गांधी रुग्णालय, पर्णकुटी चौक, येरवडा येथे हा प्रकार घडला. आरोपींनी शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकला. गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांना पैसे गुंतवायला लावले.त्यानुसार, शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण ३५लाख २४हजार २५०रुपये दिले. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा किंवा मूळ रक्कम परत केली नाही. पैसे मागितल्यावर शिवीगाळ करून रक्कम परत न देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Source link
पुणेकरांची 2.32 कोटींची फसवणूक:दोन वेगवेगळ्या प्रकरणांत ट्रस्टला देणगी आणि गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष