![]()
पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 22 जणांना दीर्घ कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय, 253 जणांना गणेशोत्सवातील मिरवणुका, सार्वजनिक सभा आणि गर्दीच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून उत्सवादरम्यान कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी परिमंडळ-7 पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा केली होती. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी, हालचाली आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन एकूण 1,292 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये विमानतळ पोलिस ठाण्यात 249, चंदननगरमध्ये 202, खराडीत 166, वाघोलीत 227, लोणी कंदमध्ये 166 आणि लोणीकाळभोरमध्ये 282 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांचा खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, व्हिडिओद्वारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, मारामारी, जुगार, मानवी तस्करी, अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्हे आणि अवैध गावठी दारूची निर्मिती व विक्री अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. गणेशोत्सव काळात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार 253 व्यक्तींवर आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन परिमंडळ-7 पोलिसांनी केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारा प्रकार आढळल्यास तात्काळ 112 क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Source link
पुण्यात गणेशोत्सवापूर्वी 22 सराईत गुन्हेगार तडीपार:कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 253 जणांना उत्सवापासून दूर राहण्याचे आदेश