Headlines

लातूर हादरले!:सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणेंची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा




शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’साठी राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 62) यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खासगी शिकवण्यांच्या वाढत्या प्रस्थामुळे महाविद्यालयांना लागलेली उतरती कळा आणि त्यातून आलेले नैराश्य, हे या टोकाच्या पावलामागील मुख्य कारण असल्याचे त्यांच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत आहे. घटना नेमकी कशी घडली? संजीव सोनवणे हे लातूर शहरातील पद्मानगर भागातील त्यांच्या निवासस्थानी राहत होते. सोनवणे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही उच्चशिक्षित (इंजिनिअर) आहेत आणि परदेशात नोकरी करतात. त्यांच्या पत्नी नुकत्याच मुलीला भेटण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. त्यामुळे सोनवणे हे घरात एकटेच होते. घरात एकटे असतानाच त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे? आत्महत्या करण्यापूर्वी संजीव सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली असून त्यातील मजकूर अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे की, “माझ्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. तसेच, पोलिसांनी माझ्या आत्महत्येचा कोणताही तपास करू नये.” असे असले तरी, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिकृत तपास करत आहेत. मित्रांनी सांगितले आत्महत्येचे खरे कारण एका यशस्वी संस्थाचालकाने असे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, त्यांच्या मित्रपरिवाराने यामागील एक गंभीर वास्तव समोर आणले आहे. गेल्या काही काळापासून लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसचे (शिकवण्यांचे) पेव मोठ्या प्रमाणावर फुटले आहे. या खासगी शिकवण्यांच्या सुळसुळाट आणि वर्चस्वामुळे अनेक अधिकृत महाविद्यालयांना उतरती कळा लागली आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रवेशावर याचा मोठा परिणाम झाला आहे. याच कारणामुळे सोनवणे यांच्यासह अनेक संस्थाचालक आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करत आहेत. यातूनच आलेल्या उद्विग्नतेतून आणि नैराश्यातून सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा त्यांच्या मित्रांनी केला आहे. संजीव सोनवणे यांचा थक्क करणारा शैक्षणिक प्रवास एका साध्या ट्युशन टीचरपासून ते शिक्षण संस्थांचे मोठे जाळे विणण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. संजीव सोनवणे यांनी बेंगळुरू येथील (तुमकुर) सिद्धगंगा कॉलेजमधून ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील चंद्रभानू सोनवणे हे औरंगाबाद विद्यापीठात हिंदी साहित्य विभागाचे प्रमुख होते. त्यांनी सुरुवातीला परळी येथे ‘संकल्प कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर सन २००० च्या सुमारास त्यांनी लातूरमध्ये संकल्प क्लासेसची सुरुवात केली. 2005च्या सुमारास त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ ‘चंद्रभानू सोनवणे कॉलेज’ची स्थापना केली. यानंतर त्यांनी बार्शीजवळील उकडगाव, तसेच सोलापूर आणि येडशी येथे शाळा व महाविद्यालये सुरू केली. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी पुण्यातील खडकवासला येथेही आपल्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला होता. ‘हसतमुख माणूस असं का वागला?’ सोनवणे यांचे वर्गमित्र आणि स्नेही शिवाजी सोनावणे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “माझे वर्गमित्र आणि बंधू असलेल्या संजीव यांनी घरातील शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने खूप मेहनत केली. खाजगी ट्युशनपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. सर्वांना सहज आणि हसत-खेळत भेटणारा, जमिनीवर पाय असणारा हा माणूस असे का वागला, हा आम्हा सर्वांसाठी एक मोठा अनुत्तरित प्रश्न आहे.” सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शवविच्छेदन आणि अधिकृत तपासांती या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. त्यांच्या जाण्याने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हेही वाचा… महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचाच; बहुभाषिक असणं ही महाराष्ट्राची ताकद: दिशा सालियान प्रकरणातील FIR राजकीय षडयंत्र नाही- नवनाथ बन महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचाच आहे, अमित शहा म्हणाले की इथे बहुभाषिक माणसं राहतात, यामध्ये काही चूक आहे का? दिल्लीतसुद्धा बहुभाषिक लोकं राहतात. मुंबईवर मराठी माणसांचा हक्क आहे हे अमित शहा आणि जनतेला सुद्धा माहिती आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. मुळात देशातील जी मोठी शहरे आहेत त्यामध्ये वेगवेगळी भाषा बोलणारे लोकं राहतात त्यांचे आपण स्वागतच केले पाहिजे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *