![]()
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भीमाशंकर मंदिर आणि परिसराच्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन, भाविकांसाठी सुविधा आणि पर्यावरणाचे रक्षण यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते. या विकास आराखड्यानुसार, ग्रामस्थांना त्यांच्या सध्याच्या जमिनीनुसार भूखंड मिळतील. त्यांना १ बीएचके, २ बीएचके आणि ३ बीएचके स्वरूपातील सुसज्ज घरे बांधून दिली जातील. नवीन गावात ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, समाजमंदिर, अन्नछत्र, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, पथदिवे, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले. मंदिर परिसरातून गावाला जोडणारा एक कॉरिडॉर तयार केला जाईल. भाविकांसाठी प्रसादगृह, थांबण्याची जागा, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे उभारली जातील. दर्शन झाल्यावर भाविक पायऱ्यांच्या मार्गाने गावात येऊ शकतील, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या व्यवसायाला फायदा होईल. नदी आणि कुंड परिसराची स्वच्छता, कुंपण तसेच भाविकांसाठी सुरक्षित तीर्थस्नानाची व्यवस्था करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांच्या सूचना आणि सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून कामांना वेग दिला जाईल आणि जून २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. विकासकामांनंतर परिसरात अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकाम होऊ नये, यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले. यावेळी भीमाशंकर मंदिर आणि परिसराच्या आराखड्याची चित्रफित दाखवण्यात आली. काम पूर्ण झाल्यावर गाव आणि परिसर कसा दिसेल, याची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली गेली. या बैठकीला भीमाशंकर येथील विश्वस्त, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Source link
भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे निर्देश; गावांचे नियोजनबद्ध पुनर्वसन होणार