Headlines

दगडूशेठ बाप्पाच्या एकदंतासाठी 55 हिऱ्यांचा ‘सिम्बॉल ऑफ ऑनर’:समर शेख यांच्या संकल्पनेतून साकारला; 9.69 कॅरेट हिऱ्यांचा वापर, एकता-बंधुत्वाचा संदेश




पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीच्या उत्सवात श्रद्धेला धर्माच्या सीमा नसतात, याचा प्रत्यय येत आहे. गणेशभक्त समर शेख यांच्या संकल्पनेतून गणरायाच्या ‘एकदंत’ रूपासाठी एक विशेष अलंकार साकारण्यात आला आहे. ‘सिम्बॉल ऑफ ऑनर’ असे या अलंकाराचे नाव आहे. उत्सवाच्या 134 वर्षांच्या इतिहासात ‘एकदंत’ रूपाला समर्पित असा हा पहिलाच अलंकार आहे. अल रझा जेम्स अँड ज्वेल्सचे मालक समर शेख यांनी हा अलंकार साकारला आहे. गणरायाच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित हा अलंकार एकता आणि बंधुभावाचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आला आहे. बाप्पाच्या मूर्तीतील ‘एकदंत’ या वैशिष्ट्यासाठी एक खास अलंकार असावा, अशी कल्पना समर शेख यांच्या मनात आली होती. त्यातूनच या अनोख्या दागिन्याची निर्मिती झाली. समर शेख यांनी सांगितले की, हा अलंकार तयार करण्यासाठी पाच कारागिरांनी दोन महिने मेहनत घेतली. यात एकूण 9.69 कॅरेट वजनाचे 55 हिरे जडवण्यात आले आहेत. या दागिन्याची बाजारातील अंदाजे किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

समर शेख यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटले, “बाप्पाची सेवा करण्याची आणि त्यांच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित अलंकार साकारण्याची संधी मिळणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. बाप्पानेच आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली.” अल रझा जेम्स अँड ज्वेल्सचे मालक समर शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा अलंकार तयार केला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि परस्पर सन्मानाची भावना दर्शवणारा हा अलंकार गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच हा दागिना पाहण्यासाठी भाविक देखील उत्सुकतेने चौकशी करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *