Headlines

खोटे आरोप सिद्ध करा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू:मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंचा बारस्कर यांना इशारा




आपल्यातच वाद होऊ नये आणि मराठा समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी आजवर अजय बारस्कर आणि अमोल खुने यांच्यावर बोलणे टाळले होते. मात्र, आता त्यांनी पुराव्यांनिशीच बोलावे, अन्यथा त्यांना हे महागात पडेल आणि वेळप्रसंगी आम्ही त्यांना कोर्टातही खेचू, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे. तसेच, जरांगे पाटील यांच्या घातपात प्रकरणात मी तक्रार दिल्यामुळेच तो अडकला, असा अमोल खुने याचा समज झाल्याने त्याचा माझ्यावर राग असल्याचेही काळकुटे यांनी पुढे स्पष्ट केले. गंगाधर काळकुटे म्हणाले, भय्यु महाराजांची दोनशे कोटींची जमीन हडपली, पुण्यात सात गुंठे जागा घेतली असे यापूर्वी माझ्यावर आरोप केले गेले. त्याचे पुरावे द्या अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार. उगाच खोटे आरोप करू नका, माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि दोषी आढळल्यास टकमक टोकावरून ढकलून द्या किंवा भर चौकात फाशी द्या, असे आव्हान काळकुटे यांनी केले आहे. तसेच मी कॉन्ट्रॅक्टर आहे, पण तीन वर्षांत एकही काम केलेले नाही. मनोज दादांपासून आम्ही बाजूला होऊन दादा एकटे पडावेत असे कोणालातरी वाटत असल्याचा संशय काळकुटे यांनी बोलून दाखवला आहे. सरकारचे शिष्टमंडळ आणायला मी एवढा मोठा आहे का? हवे तर माझे फोन कॉल्स तपासा आणि अमोल खुणे हा काय ईडीचा प्रवक्ता आहे का? असा संतप्त सवाल करत, मी बीडमध्येच असून मला कधीही अटक करा, उलट पुढच्या आठवड्यात मी स्वतःच ईडीच्या कार्यालयात जाणार आहे, असे खुले आव्हान गंगाधर काळकुटे यांनी दिले. यासोबतच, संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी पैसे दिले अशा हवेत गोळ्या न मारता, थेट पैसे घेणाऱ्याचे नाव सांगण्याचे आव्हान त्यांनी दिले. आमच्यातच चिखलफेक घडवून काही जणांना केवळ मजा बघायची असून, लक्ष्मण हाके, वाघमारे आणि सदावर्ते यांनाही तसेच वाटत असावे, असा घणाघात काळकुटे यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *